शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

आवाज श्रवणीय करणारा किमयागार

By admin | Updated: March 2, 2017 00:01 IST

रामनाथ जठार एक उत्कृष्ट फुटबॉलपटू होते. त्यांचे घर पंचगंगा नदीशेजारी असल्यामुळे

ज्येष्ठ ध्वनिलेखक रामनाथ जठार यांचं नुकतेच निधन झालं. त्यांच्या पवित्र स्मृतींना वाहिलेली ही आदरांजली.रामनाथ जठार एक उत्कृष्ट फुटबॉलपटू होते. त्यांचे घर पंचगंगा नदीशेजारी असल्यामुळे तेथील मोकळ्या मैदानावरील फुटबॉलचा खेळ त्यांना रोजच पाहावयास मिळत असे. साहजिकच आपणही या खेळात सामील व्हावे, अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली आणि काही मित्रांच्या मध्यस्थीने ते फुटबॉलपटू झाले. श्रीपतराव जामदार यांच्या सुप्रसिद्ध जामदार क्लबमधून ते आघाडीचे खेळाडू म्हणून आपली चमक दाखवू लागले. श्रीपतरावांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन रामनाथना चांगलेच उपयोगी पडले. हायस्कूलमधून होणाऱ्या फुटबॉल सामन्यांतूनही ते भाग घेऊ लागले. उत्तम खेळाडू म्हणून त्यांनी अनेक बक्षिसेही पटकाविली. कोल्हापूरच्या बालगोपाल तालीम मंडळात त्यांनी शिरकाव करून घेतला आणि बऱ्याच सामन्यांत क्लबला यश मिळवून दिले. शिवाजी पेठ प्रॅक्टिस क्लब, बाराईमाम फुटबॉल क्लब, आदी संस्था व विचारे बंधू, यशवंत तस्ते, दिनकर मगदूम या खेळाडूंची नावे रामनाथ आदरपूर्वक घेतात. या खेळामुळेच त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. मास्टर विनायकांच्या हंस पिक्चर्समधील बऱ्याच मंडळींना खेळाची आवड होती. शंकरराव पचिंद्रे ऊर्फ पचिंद्रे मामा यांच्या मदतीने रामनाथना हंस पिक्चर्समध्ये प्रवेश मिळाला आणि पचिंदे्र मामांनी आपल्या हाताखाली त्यांना लाईटिंग खात्यात शिकावू उमेदवार म्हणून रुजू करून घेतले. रामनाथ केवळ लाईटिंग खात्यात उमेदवारी करीत नव्हते, तर संकलन, पोस्टर, डिपार्टमेंट, रसायन, आदी सर्व खात्यांमध्ये त्यांचा संचार असे. विशेषत: रेकॉर्डिंगकडे त्यांचा ओढा अधिक होता. मास्टर विनायक यांच्याकडे विष्णुपंत चव्हाण हे प्रमुख ध्वनिमुद्रक होते. कोल्हापूर, पुणे, मुंबई अशी रामनाथांची भ्रमंती सुरू होती. ‘बडी माँ’ या चित्रपटानंतर विनायकरावांच्या कंपनीतून काही लोक कोल्हापूरला परतले. त्यात रामनाथ यांचाही समावेश होता. पुढे वामनराव कुलकर्णी आणि विष्णुपंत चव्हाण यांनी मंगल पिक्चर्सची स्थापना करून ‘जय मल्हार’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू केले. रामनाथांची इथे रेकॉर्डिंग खात्यात वर्णी लागली. या रेकॉर्डिंगमध्ये रामनाथ स्थिरावले, ते बाबांच्या (भालजी पेंढारकर) प्रभाकर स्टुडिओत. त्यावेळी बाबांच्याकडे आप्पासाहेब जाधव हे मुख्य ध्वनिमुद्रक होते. त्यांचे जणू शिष्यत्वच रामनाथांनी पत्करले. आप्पासाहेब जाधव आणि चिंतामणराव मोडक यांच्याकडून त्यांनी तंत्रशुद्ध रेकॉर्डिंगचे धडे अगदी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेने गिरविले आणि रेकॉर्डिंगचे तंत्र आत्मसात करून घेतले. रामनाथांचं शालेय शिक्षण अर्धवट झालं. इंग्रजीचा तर अजिबात गंधच नव्हता; पण कोणतेही तंत्र शिकायचे असेल तर शालेय शिक्षण मुळीच आड येत नाही, हे त्यांनी दाखवून दिले आणि प्रदीर्घ प्रयत्नांनी, आत्मविश्वासाने आणि एकाग्र तपश्चर्येने ते एक निष्णात ध्वनिमुद्रक बनले. गांधी हत्येनंतर झालेल्या जाळपोळीत बाबांचा स्टुडिओ बेचिराख झाला. सिनेमावाल्यांचे संसारच जणू उद्ध्वस्त झाले. उदरनिर्वासाठी रामनाथना उषा टॉकीजमध्ये आॅपरेटरची नोकरी पत्करावी लागली. पण, हे नष्टचर्य काही प्रमाणात का होईना लवकर संपले. राखेतून बाबांनी पुन्हा स्टुडिओ उभा केला आणि जळालेल्या ‘मीठ-भाकर’चं चित्रीकरण पुन्हा नव्याने सुरू झालं. रामनाथ असिस्टंट रेकॉर्डिस्ट म्हणून पुन्हा कामावर रुजू झाले. आप्पासाहेब जाधवांच्याकडे त्यांची उमेदवारी पुन्हा नव्या उमेदीने सुरू झाली. लवकरच त्यांच्या तपश्चर्येला फळ आलं. ‘नायकिणीचा सज्जा’ या आपल्या ऐतिहासिक चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाची जबाबदारी बाबांनी रामनाथवर सोपविली आणि रामनाथनी ती उत्तमरीतीने पार पाडली. तेव्हापासून रामनाथ त्यांच्या जवळजवळ सर्वच चित्रपटांचे ध्वनिमुद्रक झाले. रामनाथनी एकदा मला जवळ बोलावून एक चांगलाच कानमंत्र दिला होता. ते म्हणाले, ‘कुलकर्णी, तुमचा आवाज चांगला आहे. बऱ्याच नटांना ही देणगी नसते. ती उणीव त्यांना आपल्या अन्य अभिनय कौशल्याने भरून काढावी लागते. पण, तुमच्या आवाजाचा तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे. सीनमध्ये बरेच शॉट्स असतात. त्या शॉट्समध्ये बोलताना संपूर्ण सीनची लेव्हल सांभाळणं हे बरंचसं तुमच्या आवाजाच्या गतीवर व लयीवर अवलंबून असतं.’नटांच्या आवाजाची लेव्हल सांभाळताना ध्वनिमुद्रकाला बरीच कसरत करावी लागते. हे माझ्या ध्यानात आलं आणि म्हणून डबिंगच्या या कृत्रिम युगात मूळ रेकॉर्डिंगला बोलावलं जात नाही, ही रामनाथांची तक्रार मला रास्त वाटली. त्यांचं म्हणणं असं की, शूटिंगच्यावेळी कलावंताच्या आवाजाची जी लेव्हल आम्ही ठेवलेली असते, ती डबिंग रेकॉर्डिस्टला कशी कळणार? नागरावर घेतलेला पायलट ट्रॅकसुद्धा अत्यंत स्वच्छ, लयबद्ध आणि निर्दोष असला पाहिजे, असा रामनाथांचा आग्रह असतो. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत रामनाथांनी २००हून अधिक चित्रपटांचे ध्वनिमुद्रण केले. ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक अशा सर्व चित्रपटांचा त्यात समावेश आहे. कॅमेऱ्याप्रमाणेच ध्वनिमुद्रण यंत्रात आणि तंत्रात अनेक स्थित्यंतरे झाली. बदलत्या परिस्थितीप्रमाणे रामनाथही बदलत राहिले. नवं तंत्र आत्मसात करीत राहिले. एकविसाव्या शतकाच्या नव्या सहस्रकातही ते कार्यरत होते. त्यांनी ध्वनिमुद्रित केलेल्या अनेक चित्रपटांना पारितोषिके मिळाली आहेत.‘शिकलेली बायको’च्या उत्कृष्ट ध्वनिमुद्रणाबद्दल रसरंगचे फाळके पारितोषिक, सुवासिनी, पाठलाग, सामना, शाब्बास सूनबाई, काल रात्री बारा वाजता या चित्रपटांच्या उत्कृष्ट ध्वनिमुद्रणाबद्दल महाराष्ट्र शासनाची पारितोषिके त्यांनी पटकाविली आहेत, पण या सर्वांत त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते, ते चतुरंग संस्थेने दिलेले भालजी पारितोषिक. कारण भालजी म्हणजे त्यांना भावणारी देवतुल्य विभूती. बाबांनी मला ध्वनिमुद्रक केले आणि मला जन्माची भाकरी मिळाली. त्या भाकरीवरच मी अद्यापि जगतो आहे. बाबा नसते तर माझ्या अस्तित्वाला काही अर्थच राहिला नसता, असं रामनाथ भावविवश होऊन बोलतात. सिनेमा चांगला कुठला? जो चांगला दिसतो आणि अगदी स्वच्छ चांगला एकू येतो, तो चांगला चित्रपट. चांगला दिसण्याचं काम वसंत शिंदे यांच्यासारख्या कसबी छायांकनकारांनी अत्यंत उत्तमरीतीने केले आहे. चित्रपटांना आवाज प्रभावीपणे, परिणामकारकरीतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याच गुंतागुंतीचं आणि जबाबदारीचं काम रामनाथांनी आपलं तंत्र कौशल्य पणाला लावून, इमानेइतबारे पार पाडले. रामनाथजी सर्वांवर सारखं प्रेम करीत. ते अजातशत्रू राहिले. तंत्रशुद्ध, सुसंगत, लयबद्ध कसं बोलावं हे त्यांनीच शिकवलं. त्यांच्या कर्तृत्वसंपन्न प्रदीर्घ कारकिर्दीला विनम्र प्रणाम.- भालचंद्र कुलकर्णी,शब्दश्री, शिवप्रभू नगर, कळंबा, रिंगरोड, कोल्हापूर