मलकापूर : पूर, भूस्खलनामुळे ज्यांचे शेती, घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शाहूवाडी - पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी केले. शाहूवाडी तालुक्यातील कानसा खोऱ्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर आढावा घेताना ते बोलत होते.
कानसा खोऱ्यात पावसाचे प्रमाण अधिक असून, येथील नद्यांना नेहमी पूर येतो. प्रत्येक वर्षी शेतकऱ्याचे पावसाच्या पाण्याने घरे व शेतीचे नुकसान होत आहे. मालेवाडी, सोंडोली, कांडवण, रेठरे, गोंडोली, शित्तुर वारूण, उखळू तुरुकवाडी, नेर्ले आदी गावांमध्ये वारणा नदीच्या पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांची शेती व घरांची पडझड होण्यासह व जनावरे वाहून जाणे आदी नुकसानाची पाहणी आमदार विनय कोरे, ‘गोकुळ’चे संचालक करणसिंह गायकवाड, जिल्हा बॅंकेचे संचालक सर्जेराव पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी तहसीलदार गुरु बिराजदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. व्ही. भोसले, पंचायत समिती सदस्य अमर खोत, माजी उपसभापती महादेव पाटील, बबन पाटील, कृष्णा पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश व्हनागडे, तानाजी भोसले, रंगराव पाटील, विश्वास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : कानसा खोऱ्यातील पूरपरिस्थितीची पाहणी आमदार विनय कोरे, सर्जेराव पाटील, करणसिंह गायकवाड, गुरु बिराजदार आदींनी केली.