कसबा बीड : कसबा बीड (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर करत सरपंच उत्तमराव वरुटे यांना धक्का दिला. १०४१ विरुद्ध ७१३ अशा मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.गुरुवारी दि. १७ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत ग्रामसभा झाली. त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान झाले. त्यात १८३४ मतदारांनी मतदान नोंदणीसाठी सहभाग नोंदविला. ११ वाजल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. ही प्रक्रिया चार वाजेपर्यंत चालली. एकूण ६ वाॅर्डांत ठरावाच्या बाजूने झिरो विरुद्ध त्रिकोण या चिन्हाच्या आधारे मतदान घेण्यात आले. यावेळी १८०९ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यातील १७५४ मते वैध ठरली, तर ५५ अवैध ठरली. अविश्वास ठरावाच्या बाजूने १०४१ मतदान झाले, तर विरोधात ७१३ इतके मतदान झाले. ३२८ मतांनी ठराव मंजूर झाला. लोकनियुक्त सरपंच उत्तमराव वरुटे यांना बीडकरांनी जोरदार धक्का दिला आहे. विरोधी नेत्यांनी गावातील सर्वच गटातटाची भक्कम मोट बांधून अविश्वास ठराव विरोधी मतदान करून घेतले.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, सर्व मतदान प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी, यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे व टीम, गोपनीयचे अविनाश पवार, कसबा बीडचे पोलिस पाटील पंढरीनाथ ताहसिलदार, तलाठी यांनी निवडणुकीचे नियोजन केले होते.
Kolhapur: कसबा बीडच्या गावकऱ्यांनी लोकनियुक्त सरपंचांना मतदानाद्वारे पदावरून हटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:47 IST