गडहिंग्लज : नूल (ता. गडहिंग्लज) येथील अवघ्या ९ वर्षाच्या बालिकेचा कोरोनाने बळी घेतला. केवळ एक दिवसाच्या तापाचे निमित्त झाले आणि नवव्या दिवशी तिची प्राणज्योत मालवली. कोरोनामुळे झालेला बहुदा जिल्ह्यातील हा सर्वात कमी वयाचा मृत्यू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
नूल ग्रामस्थ आणि आरोग्य खात्याच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, २७ जून २०२१ रोजी नूल येथील त्या बालिकेला अचानक खूप ताप आला. रात्री लघुशंकेसाठी उठली असता ती एकदम बेशुद्ध पडली. त्यामुळे नातेवाइकांनी तिला तातडीने गावातील नूल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.
प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तिला गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात आणण्यात आले. त्यानंतर तातडीने तिला कोल्हापूर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
२८ जूनला तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातून बरे होतेय असे वाटत होते. परंतु, काही केल्या तिचा ताप कमी झाला नाही. दरम्यान, सोमवारी (५ जुलैला) तिच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू असतानाच बुधवारी (७ जुलै) रोजी मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे नूलसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
---------
चौकट.
कुटुंबीयांना जबर धक्का..! चौथीतून ५ वीत जाणारी ‘ती’ मुलगी खूपच गोड होती. तिचे कुटुंबीय गरीब आहेत. तरीदेखील उधार - उसनवार करून त्यांनी तिचे प्राण वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु, त्याला यश आले नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांसह कन्या शाळेतील तिच्या मैत्रिणी व शिक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे.
---
तिसऱ्या लाटेपूर्वीच पहिला बळी! कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी खूप घातक असल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. परंतु, अगदी एक दिवस ताप आला अन् त्या निरागस बालिकेचा प्राण घेऊन गेला. तीन महिने उलटले तरी दुसरी लाट जिल्ह्यातून ओसरण्याचे नाव घेईना. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वीच कोरोनाने घेतलेल्या या बालिकेच्या बळीने बालकांच्या पालकांसह जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.