सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी माजी मंत्री मदन पाटील, आ. अनिल बाबर, मोहनराव कदम, विलासराव शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. २१ जागांसाठी एकूण ६६ अर्ज दाखल झाले असून सोमवारी एका दिवसात ४४८ अर्जांची विक्रमी विक्री झाली. त्यामुळे ही निवडणूक इच्छुकांच्या गर्दीमुळे रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ४ एप्रिलपासून सुरू झालेली अर्ज दाखल करण्याची मुदत येत्या ८ एप्रिल रोजी संपणार आहे. त्यामुळे सोमवारपासून अर्ज दाखल व विक्रीसाठी बँकेत गर्दी होत आहे. सोमवारी दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. कार्यकर्त्यांसह नेते उपस्थित राहिल्याने दिवसभर बँकेत गर्दी दिसत होती. एकूण ६६ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल होण्याचे आणि विक्रीचे प्रमाण अधिक आहे. एका दिवसात तब्बल ४४८ अर्जांची विक्री झाली असून यापूर्वी १८२ अर्जांची विक्री झाली आहे. एकूण ६३0 अर्जांची विक्री झाली आहे. सोमवारी आ. बाबर, मदन पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, दिलीप वग्याणी, माजी आमदार मानसिंगराव नाईक, दिनकर शामराव पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, माजी जि. प. सदस्य संभाजी कचरे, सुरेश शिंदे यांनी अर्ज दाखल केले. नेत्यांच्या मुलांनीही या निवडणुकीत रस दाखविल्याचे दिसून आले. विलासराव जगताप यांचा मुलगा मनोज, विलासराव शिंदे यांचा मुलगा वैभव, पतंगरावांचे जावई महेंद्र लाड यांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नेत्यांच्या घरातील दुसरी पिढीही आता जिल्हा बँकेच्या मैदानातून राजकारणात येऊ पाहात असल्याचे दिसत आहे.दरम्यान, अपात्र संचालकांच्या बाबतीत न्यायालयाचा काय निर्णय होतो यावरच दिग्गजांचे भविष्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)नियमांची अडचणनव्या तरतुदींप्रमाणे राखीव जागेतून अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संस्थेच्या सचिवांचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. अशावेळी ठरावाची गरज नाही. त्यांनी केवळ सचिवांकडून सभासद असल्याचा दाखला घ्यायचा आहे. अन्य गटातील उमेदवारांनी यापूर्वी कोणत्या तरी संस्थेवर संचालक म्हणून किमान एक वर्ष काम केल्याच्या अनुभवाचा संबंधित संस्थेच्या सचिवाचा दाखला सादर करणे गरजेचे आहे. नव्याने संचालक झालेल्या उमेदवारांचे काय होणार?, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. मतमोजणी केंद्राची तयारीमतमोजणी केंद्राबाबत अद्याप जागा निश्चिती झालेली नाही, तरीही तरुण भारत क्रीडांगणातील बॅडमिंटन हॉलसाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत सध्या पक्षीय स्तरावर धोरण निश्चित झालेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना व अन्य पक्षांच्या नेत्यांनी सर्वच इच्छुकांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर इच्छुक जिल्हा बँकेत येऊन अर्ज नेत आहेत. अर्ज दाखलचे आणि विक्रीचे प्रमाण मोठे असल्याचे दिसत आहे.
जिल्हा बँकेसाठी दिग्गजांचे अर्ज दाखल
By admin | Updated: April 7, 2015 01:19 IST