कोल्हापूर : संचारबंदीच्या पहिल्या दिवशी भाजीमंडईतून झालेली गर्दी पाहता या गर्दीवर नियंत्रण राहावे म्हणून शहरातील वेगवेगळ्या मैदानांवर त्यांना बसविण्यात येणार आहे. रस्त्यावर होणारी गर्दी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापुरात बुधवारी रात्रीपासून पंधरा दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गुरुवारी पहिलाच दिवस संचार बंदीची चेष्टा करणारा ठरला. शहरातील विविध रस्त्यांवर नागरिक आणि वाहनधारकांचा मुक्त संचार दिसला. भाजीमंडईत देखील गर्दी होती. मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात तर फारच गर्दी झाली होती. त्यामुळे प्रशासक बलकवडे यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता तातडीने महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी बैठक घेतली.
रस्त्यावरील गर्दीबाबत बलकवडे यांनी चिंता व्यक्त केली. काहीही करा; पण मला रस्त्यावर गर्दी दिसता कामा नये, भाजीमंडईत गर्दी नको आहे, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या. त्यावर बैठकीत भाजीमंडईतील विक्रेत्यांना रस्त्यावर आणून सुरक्षित अंतरावर बसविणे किंवा शहरातील मैदानावर भाजी विक्रीची व्यवस्था करणे या दोन पर्यायावर चर्चा झाली.
-बिले प्रलंबित असल्याने बॅरिकेट्स मिळताना अडचण
ज्या भागात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत, त्या भागात त्या रुग्णाचे घर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून बॅरिकेट्स लावण्याच्या विषयावर चर्चा झाली; परंतु गतवर्षीचे मंडपवाल्यांचे पैसे दिले नसल्याने बॅरिकेट्ससाठी साहित्य पुरविण्यावर स्पष्ट नकार दिला असल्याचे काही अधिकाऱ्यांनी प्रशासक बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, प्रत्येक विभागीय कार्यालयाने त्याची सोय करावी, असे बलकवडे यांनी सुचविले.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, निखिल मोरे, सहायक आयुक्त विनायक औधकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, अतिक्रमण निर्मूलन प्रमुख पंडित पोवार उपस्थित होते.