आमजाई व्हरवडे : राधानगरीच्या सभापती वंदना हळदे व उपसभापती मोहन पाटील या दोघांनीही राजीनामे दिल्याने ही दोन्हीही पदे सध्या रिक्त आहेत. उद्या शुक्रवारी उपसभापतीपदाची निवड होणार असून, या पदासाठी काँग्रेसच्या वनिता भरत पाटील (कसबा वाळवे) यांची निवड निश्चित मानली जात आहे.
राधानगरी पंचायत समितीवर गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे वर्चस्व आहे. तरीही ए. वाय. पाटील यांनी समझोत्याची भूमिका घेत गत चार वर्षांत शिवसेना व काँग्रेसलाही पदे देऊन राजकारणात आपला मोठेपणा दाखवून दिला. विद्यमान सभापती वंदना हळदे व उपसभापती मोहन पाटील यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामे दिल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. सभापती पदासाठी सोनाली शिवाजी पाटील (सोंळाकुर) यांचे नाव निश्चित असून, सभापतीपदाच्या निवडीची तारीख जुलैअखेर असल्याने उद्या शुक्रवार, ९ जुलै रोजी उपसभापती पदाची निवड होणार आहे.