शिरोळ : सर्वांच्या भावनेचा आदर राखत वनतारा प्रशासनाने महादेवी हत्तीणीला परत नांदणी येथे पाठवण्यासाठी उच्चाधिकार समितीला तत्काळ अर्ज करावा, ही माझी भावना आहे. वनतारा प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा, असे आवाहन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी शुक्रवारी रात्री नांदणी येथे दिला.कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी झालेल्या वनतारा समितीच्या बैठकीत काय निर्णय झाला? पुढील दिशा काय असणार? हे जाणून घेण्यासाठी राज्यासह सीमाभागातून हजारो नागरिक नांदणी मठात दाखल झाले होते. अखेर रात्री उशिरा नांदणी मठामध्ये महास्वामींनी सर्वांशी संवाद साधला.
ते म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत आहात हे आज दाखवून दिले. आपण सर्व काही गोष्टी संयमाने जिंकू शकतो, हे आज दिसून आले आहे. तुमच्या सर्वांच्या रेट्यामुळेच वनतारा प्रशासनाला कोल्हापुरात यावे लागले. सर्वधर्मीयांची सहानुभूती याच्यासाठी लाभलेली आहे. या जनसमुदायाबरोबर राजकीय नेते मंडळींनीदेखील माझ्यासोबत शेवटपर्यंत राहावं, ही माझी भावना आहे. हे गुरुपीठ ७४३ गावांचे नव्हे तर आज अखंड जगभराचे झाले आहे. या गुरुपीठाच्या पाठीशी सर्वांनीच कायमपणे उभे राहावे, असे आवाहनही मठाधिपती यांनी केले.यावेळी खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश खाडे, राहुल आवाडे, डॉ. अशोकराव माने, सावकार मादनाईक, उद्योगपती आण्णासाहेब चकोते, कृष्णराज महाडिक, संजय पाटील-यड्रावकर, दक्षिण सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, सागर शंभुशेटे, सागर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ती गेल्याने नांदणी गाव सुने सुने झाले.. आबालवृद्धांचे महादेवीच्या आठवणीने डोळे पाणावले..