मलिग्रे (ता. आजरा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ९५५१ नागरिकांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले आहे. पहिला डोस ७६७२, तर दुसरा डोस १८७९ असे कोव्हॅक्सिन, कोविशिल्डची लस देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांनी दिली.
लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण २८ गावे २ वाड्यावस्त्या आहेत. प्रत्येक नागरिक लसीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक उपकेंद्रामध्ये लसीकरण घेण्याचे नियोजन करण्यात आले असून त्या पद्धतीने कार्यवाही सुरू आहे.
सध्या कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्यात आलेले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांना स्वॅब तपासणीसाठी कोविड सेंटर आजरा येथे ने-आण करण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. तसेच लसीकरण पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. के. के. काझी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्यसेविका, कनिष्ठ सहायक, परिचर, डाटा एंट्री ऑपरेटर, आशा गटप्रवर्तक व आठ केंद्रातील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका मदतनीस, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्राथमिक शिक्षक, सनियंत्रक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे.
लसीकरण पूर्ण होण्यासाठी जि. प. सदस्या सुनीता रेडेकर, पं. स. उपसभापती वर्षा बागडी, प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामदक्षता समिती यांचे नियोजन व सहकार्य असल्यामुळेच मोठ्या प्रमाणात मलिग्रे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोनाचे लसीकरण पूर्ण करणे शक्य झाले आहे, अशीही माहिती डॉ. गुरव यांनी दिली.