भीमगोेंडा देसाई ल्ल कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील हे पन्हाळा तालुका व्यसनमुक्त करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून अनवाणी प्रबोधन करीत आहेत. पुढील तीन वर्षांत संपूर्ण तालुका व्यसनमुक्त करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. जोपर्यंत तालुक्यातील सर्व गावांतील दारूची बाटली आडवी होणार नाही, तोपर्यंत पायांत चप्पल न घालण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. ‘निर्मल भारत’च्या प्रभावी कामांमुळे राज्यात चर्चेत आलेले पाटील यांच्या व्यसनमुक्त अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. पाटील यांचे गाव पन्हाळा तालुक्यातील कोडोली. ते सन २००७ ते २०१०अखेर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्या कालावधीत त्यांनी ‘निर्मल अभियाना’ला लोकचळवळीचे स्वरूप देत कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशपातळीवर पोहोचविले. समाजहितासाठी ते अभिनव उपक्रम राबवीत असतात. तंबाखू, सिगारेट, दारू यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या घटना तालुक्यात वाढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, कोणाचा पती व्यसनाला बळी गेल्याने अस्वस्थ झाले. ८ डिसेंबर २०१५ रोजी वाढदिवसादिवशी त्यांनी तालुका व्यसनमुक्त करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दारूची बाटली आडवी होईपर्यंत पायांत चप्पल न घालण्याच्या संकल्पाची अंमलबजावणी त्यांनी सुरू केली. प्रबोधनासाठी त्यांनी माहिती पुस्तिका काढली आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ३६ शाळांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आहे. व्यसनाचे दुष्परिणाम सांगून आयुष्यात कधीही व्यसन करणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांना दिली आहे. व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी रोज वडिलांच्या पाया पडून विनंती करण्याचा मंत्र त्यांनी दिला. तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करून ते व्यसनविरोधी जागृतीची ज्योत पेटवीत आहेत. दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत, सेवा संस्था, कारखाने यांना भेट देणे, राजकीय नेत्यांना निवेदने देणे, दारू दुकानदारांना भेटून विक्री न करण्याची विनंती करणे अशा कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. १५ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना रायगड, प्रतापगड दर्शन घडवून आणणार आहेत. गडावर नेऊन व्यसनमुक्तीची शपथ देतील. अशा प्रकारे जागृतीच्या माध्यमातून ते व्यसनमुक्तीसाठी आवाहन करणार आहेत. त्याची दखल न घेतल्यास २६ जानेवारी २०१७ पासून लोकशाही मार्गाने आंदोलन करून लक्ष वेधणार आहेत.
भारत पाटील यांचे व्यसनमुक्तीसाठी अनवाणी प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 01:53 IST