लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तुर-वारुण : राघूचा धनगरवाडा ते उदगिरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरील खडी उखडून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर मातीचे ढिगारेही तयार झाल्यामुळे प्रवासी व वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. शाहूवाडी तालुक्याच्या एका टोकाला असलेल्या व जागृत देवस्थान असणाऱ्या उदगिरीकडे जाणारा शित्तुर-वारुण ते राघूचा धनगरवाडावरून उदगिरी हा मुख्य मार्ग असून, या रस्त्यावर गेली अनेक वर्षे अपवाद वगळता डांबरीकरण झालेलेच नाही. गतवर्षी या रस्त्याचे खडीकरण झाले होते. परंतु, या रस्त्यावरील आहे ती खडीही पूर्णपणे उखडून रस्त्यावर नुसते खड्डेच खड्डे पडले आहेत. पादचाऱ्यांनाही या रस्त्यावरून नीट चालता येत नाही तर दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना या रस्त्यावरून गाडी चालवताना कमालीची कसरत करावी लागत आहे. शित्तुर-वारुण ते उदगिरी हे अंतर किमान सोळा किलोमीटर असून, उदगिरी हे पर्यटनस्थळ व प्रसिद्ध देवस्थान असल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे या मार्गावर वाहतूक अधिक प्रमाणात असते. तसेच या विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे रस्ता वारंवार खराब होतो. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांमधून होत आहे.
फोटो:
राघूचा धनगरवाडा ते उदगिरी रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.