नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर प्राप्त व्हावे, यासाठी आज शनिवारी येथील विठ्ठल मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य अमोल विभुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२०१९ साली आलेला महापूर त्यानंतर सुरू झालेला कोरोना व त्यानंतर पुन्हा २०२१ साली आलेला महापूर यामुळे नृसिंहवाडीतील लोकांच्या अर्थचक्राला मोठा फटका बसला आहे. ग्रामस्थांना शासनाकडून लवकरात लवकर सानुग्रह अनुदान मिळेल, अशी आशा होती. आज पूर उतरून महिना होऊन गेला तरीसुद्धा येथील ग्रामस्थांना सानुग्रह अनुदान पूर्णपणे मिळाले नाही. कोरोनामुळे येथील दत्तमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने छोटे व्यावसायिक दुकानदार पुरोहित, व्यापारी या सर्वांचे आर्थिक चक्र बंद पडले आहे. शनिवारी येथील विठ्ठल मंदिरासमोर सकाळी दहा वाजलेपासून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे विभूते यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच रमेश मोरे, विकास कदम, अविनाश निकम, सुशील पुजारी, संजय गवंडी, शिवराज जाधव, रामचंद्र कुंभार, सुरेश गवंडी, गणेश पाडगावकर आदी उपस्थित होते.