कोल्हापूर : कारचालकास लुटणाऱ्या दोघा महिलांना रविवारी दुपारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. मनिषा परशराम ननवरे (वय २७) व अनिता विकास नाईक (२४, दोघी, रा. नेर्ली-तामगाव, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. ताराबाई पार्क येथील एका कंपनीत चालक म्हणून नोकरी करणारे सचिन आनंदराव पोलादे (४०, रा. मंगळवार पेठ) रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ते फियाट कार घेऊन तोरस्कर चौकामार्गे सानेगुरुजी वसाहतीकडे निघाले होते. यावेळी चौकात थांबलेल्या दोन अनोळखी महिलांनी त्यांना हात केल्याने त्यांनी कार थांबविली. त्यांनी आमचे लहान बाळ खूप आजारी आहे, आम्हाला पंचगंगा रुग्णालय येथे सोडा, आम्ही तुमच्या पाया पडतो, अशी विनवणी केली. त्यामुळे त्यांनी या दोघींना कारमध्ये घेतले. काही अंतर गायकवाड बंगल्याजवळ गेल्यावर त्यांनी कार थांबविण्यास सांगितली. त्यानंतर एकीने तू माझी अब्रू लुटत होतास, असे आरडाओरड करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर या दोघींनी त्यांच्याकडील अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, पैसे व मोबाईल असा सुमारे २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर पोलादे यांनी लक्ष्मीपुरी पोलीसांत फिर्याद दिली. पोलिसांनी या महिलांना गंगावेश परिसरात अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांनी आणखी किती लोकांना लुटण्याचा प्रयत्न केला आहे, याची चौकशी पोलीस करत आहेत. या घटनेची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी घेतली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे करत आहेत. (प्रतिनिधी)
कारचालकाला लुटणाऱ्या नेर्लीतील दोन महिलांना अटक
By admin | Updated: August 24, 2015 00:26 IST