कोल्हापूर : इलेक्ट्रिशियनचे काम आटोपून गावी निघालेल्या तरुणाचा शिंगणापूर बंधाऱ्यावर अपघात झाला. दुचाकीवर मागे बसलेला तरुणाचा बंधाऱ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. नितीन शामराव माने (वय ३०, रा. सोनतळी, ता. करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना पहाटे घडली. दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे नितीन माने हे कुटुंबियांसह राहतात. ते इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री ते त्यांच्या एका मित्रासोबत इलेक्ट्रिशनच्या कामाला गेले होते. मध्यरात्री काम आटोपून ते मित्राच्या दुचाकीवरून घराकडे परतत होते. दरम्यान, शिंगणापूर बंधाऱ्यावर आल्यानंतर दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी बंधाऱ्याच्या दगडाना धडकली. या अपघातात दुचाकीस्वार बंधाऱ्यावर पडला. तर मागे बसलेला नितीन माने हे थेट बंधाऱ्यात कोसळले. त्यात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत करवीर पाेलिसांना माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील सुनील कांबळे, कृष्णा सोरटे, दीपक पाटील, शुभांगी घराळे यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. त्यांनी तत्काळ शोधमोहीम राबवित नितीन यांचा मृतदेह बंधाऱ्यातून बाहेर काढला. या अपघाताची नोंद अनैसर्गिक मृत्यू अशी पोलिसांत झाली आहे.