कऱ्हाड : महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील नांदलापूर बसस्टॉपसमोर महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा वानरांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन वानरांचा जागेवरच मृत्यू झाला, तर अन्य चार वानरे गंभीर जखमी झाली.एकाच वेळी सहा वानरांना ठोकरून निर्दयी वाहनचालक न थांबता निघून गेला. महामार्ग सुरक्षा रुग्णवाहिकेतून जखमी वानरांना उपचारासाठी नेण्यात आले. उपस्थित नागरिकांनी मृत वानरांवर अंत्यसंस्कार केले. येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनांनी ठोकरून मृत्युमुखी पडणाऱ्या पाळीव जनावरे व वन्यजीवांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे याचा विचार वेळेवरच होणे आवश्यक झाले आहे. कारण या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंला मोठ्या प्रमाणात शेती असल्यामुळे दररोज पाळीव प्राणी, श्वान, वानर आदी प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची खरी गरज आहे. असे असतानाच रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आशियायी महामार्गावर नांदलापूर स्टॉपसमोरून सहा वानरे रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती.यावेळी कोल्हापूरकडून कऱ्हाडकडे येणाऱ्या अज्ञात वाहनाने या वानरांना जोरदार धडक दिली. यात दोन वानरांचा मृत्यू झाला. तर चार वानरे गंभीर जखमी झाली. महामार्ग सुरक्षा कंपनीच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सर्व जखमी वानरांना उपचारासाठी नेण्यात आले.यावेळी राजयोग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विकास सूर्यवंशी, अमृत पटेल, नितीन पटेल, राजेंद्र कुंभार, जगन्नाथ पाटील व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महामार्ग ओलांडणाऱ्या दोन वानरांचा मृत्यू
By admin | Updated: January 12, 2016 00:33 IST