कोल्हापूर : राजारामपुरीतील माऊली पुतळा ते राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या मार्गावर सशस्त्र हल्ला करून लुटणे किंवा तत्समत हेतूने फिरणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. विपुल वासीम मलिक (वय२४, रा.सम्राटनगर) व विनायक दत्तात्रय जाधव (२०, रा. राजारामपुरी बारावी गल्ली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, संशयित मलिक व जाधव हे मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास माऊली पुतळा ते राजारामपुरी पोलिस ठाणे या रस्त्यावरून संशयितरित्या दुचाकीवरून जात होते. या दरम्यान पोलिसांनी या दोघांना अडविले. त्यातील मागे बसलेला विनायकने उडी मारून पळ काढला. तर मलिक यांची पोलिसांनी अंगझडती घेतली असता कुकरीसारखे धारदार शस्त्र त्याच्या जवळ आढळले. दुसरा संशयित विनायक जाधव हा दुचाकीवरून उडी मारून पळून गेला.मात्र, गुन्हे शोध पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास दोघांना अटक केली. त्यांच्याकडील दुचाकी व कुकरीसारखे धारदार शस्त्र असे एकूण ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबतचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर करीत आहेत.
कोल्हापुरात दोघा संशयित गुन्हेगारांना अटक; सशस्त्र हल्ला करून लुटणे, तत्समत हेतूने होते फिरत
By सचिन भोसले | Updated: September 14, 2022 19:22 IST