कोल्हापूर : वाशी (ता. करवीर) येथे कार्यक्रमात जेवणानंतर परंपरेनुसार भांडी घासण्याच्या भाऊबंदकीतील वादातून चुलतभावाचे डोके झाडाच्या कठड्यावर (पारावर) आपटून खून केल्याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. महादेव मंगेश पुजारी (वय ४४) व अशोक मंगेश पुजारी (४७, दोघेही रा. वाशी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत, तर आण्णाप्पा आप्पाजी पुजारी (४७) असे मृताचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. गुडघे यांनी गुरुवारी ही शिक्षा सुनावली.
----------------------------------------
सांगलीजवळ सहा लाखांचा तांदूळ जप्त
सांगली : मिरज येथून शिराळा येथे रेशनिंगचा तांदूळ घेऊन चाललेला ट्रक सांगली ग्रामीण पोलिसांनी लक्ष्मी फाट्यानजीक पकडला. या ट्रकमध्ये तब्बल सहा लाख २ हजार १०० रुपये किमतीचा २० टन ७० किलो तांदूळ आढळून आला. याप्रकरणी रमेश बाबू गुंडेवाडी (रा. सलगरे), प्रकाश केरबा पाडुळे व विजय दत्तात्रय शिंदे (दोघेही रा. हरिपूर) यांना अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे तांदळाचा साठा करून तो काळ्या बाजारात विकण्याचा संशयितांचा प्रयत्न होता.
----------------------------------------
दुचाकी चोरी करणारे दोघे ताब्यात
सातारा: येथील सदर बझार परिसरात सातारा शहर पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका युवकाला अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. विकास मुरलीधर मुळे (रा. मंगळवार पेठ, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे तर त्याच्यासमवेत एक अल्पवयीन युवकासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दुचाकी सातारा, कऱ्हाड, सांगली व पुणे परिसरातून चोरल्या गेल्या आहेत.
----------------------------------------
आवास योजनांची कोकण विभागातील ११,३३४ घरे रखडली
रत्नागिरी : ‘सर्वांसाठी घरे’ हे सरकारचे उद्दिष्ट असले तरी राज्य सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने कोकण विभागातील विविध रमाई आवास योजनेसह अन्य आवास योजनांची ११,३३४ घरे रखडली आहेत. ही घरे राज्य शासनाच्या महाआवास अभियान ग्रामीणमधून गतिमान करण्यात येणार आहेत.
कोकण विभागातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना गेल्या पाच वर्षात ५६,९७४ एवढ्या घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ४५,६४० घरांना मंजुरीही मिळाली होती. मात्र, यापैकी अजूनही ११,३३४ घरे ही निधीअभावी अपूर्ण राहिलेली आहेत.
----------------------------------------
तळवणेतील युवकाची गळफासाने आत्महत्या
सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग): तळवणे भाटलेवाडी येथील रुपेश जनार्दन पोळजी ( ३७) या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. लॉकडाऊन काळापासून रुपेशची मानसिक स्थिती बिघडलेली होती. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.याबाबत रुपेशच्या चुलत भावाने सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.
----------------------------------------
सुरक्षा रक्षकांचे पगार गेले २६ महिने थकीत
सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग): शिरगांव व सावंतवाडी येथील तंत्र विद्यालयात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे पगार गेले २६ महिने थकीत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार तत्काळ न झाल्यास पुढील आठवड्यापासून सर्व सुरक्षा रक्षक उपोषण करणार आहेत, असा इशारा सुरक्षा रक्षक एकता समितीचे अध्यक्ष विजय गुरव यांनी दिला आहे.सव्वीस महिने पगार नसल्याने सुरक्षा रक्षकांची सहनशीलता संपली आहे.