घराच्या पाठीमागील पडीक जागेच्या हद्दीच्या कारणावरून ऐनापूर येथील सतीश शंकर देसाई व त्यांची पत्नी मेघा सतीश देसाई या दोघांना मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी नागोजी भिमगोंडा पाटील, कृष्णा नागोजी पाटील (दोघे रा. सांबरे, जि. बेळगाव) आणि प्रकाश बसगोंडा देसाई, सुवर्णा प्रकाश देसाई (दोघेही रा. ऐनापूर, ता. गडहिंग्लज) या चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, गुरुवार (दि. ३) सकाळी साडेसहा वाजता सतीश व त्यांच्या पत्नी मेघा हे दोघेजण जनावरांचे शेण घरामागील परड्यात नेऊन टाकत होते. त्यावेळी नागोजी हा परड्यातील वेल खुरप्याने कापत होता. तेंव्हा सतीश यांनी त्याला वेल कापू नका असे सांगत होते. त्यावेळी नागोजी, कृष्णा, प्रकाश व सुवर्णा यांनी सतीश व मेघा यांना मारहाण केली.
दरम्यान, नागोजी हे खुरप्याने सतीश यांना मारत होते. त्यावेळी सतीश यांनी त्याचा हात पकडला. त्यावेळी कृष्णा याने लाकडे फोडण्याच्या कुऱ्हाडीने सतीशच्या डोकीत, उजव्या कानाच्या वरच्या बाजूस मारून जखमी करून बघून घेण्याची धमकी दिली.
सतीश देसाई यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत वरील चौघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे.