कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यातील एक अर्ज हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर दुसरा अर्ज अपक्ष म्हणून भरण्यात आला आहे. दरम्यान, भाजपचे नगरसेवक विजय सूर्यवंशी यांच्यासह चार जणांनी बारा अर्ज नेले. विधान परिषद निवडणुकीसाठी २७ डिसेंबरला मतदान, तर ३० डिसेंबरला मतमोजणी होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज विक्री व अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया होत आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व अपक्ष असे दोन अर्ज जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे भरले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, उपमहापौर शमा मुल्ला, माजी महापौर आर. के. पोवार उपस्थित होते. अर्ज भरण्यासाठी उमेदवारासह फक्त पाचजणांनाच प्रवेश देण्यात आला. (प्रतिनिधी)पत्रकारांना टाळले : उडवाउडवीची उत्तरे...अर्ज भरण्यासाठी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह आर. के. पोवार, राजेश लाटकर, नगरसेवक सुनील पाटील, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष सुनील मजलेकर, पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, नगरसेवक युवराज शहा, अर्जुन पाटील, अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील, मुनीर शेख, आप्पासाहेब खामकर आदी प्रमुख पदाधिकारी दुपारी दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते; परंतु या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अर्ज भरण्यासाठी आला आहात का? अशी विचारणा केल्यावर त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो आहोत, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, तसे त्यांच्याकडून प्रसिद्धीमाध्यमांना सांगण्यात आले. यावरून ते याबाबत अनभिज्ञ होेते का? त्यांनी जाणीवपूर्वक सांगण्याचे टाळले, अशी चर्चा या ठिकाणी सुरू होती. भाजपचे नगरसेवक विजय सूर्यवंशी यांनी चार अर्ज नेले.गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी चार अर्ज नेण्यात आले.अलंकृता आवाडे-बिचुकले यांनी स्वत:साठी दोन अर्ज, तर अभिजित आवाडे यांच्यासाठी दोन अर्ज नेले.
यड्रावकरांनी भरले दोन अर्ज
By admin | Updated: December 8, 2015 00:39 IST