देवर्डे (ता. आजरा) येथे टस्कर हत्तीने बाळू आढाव यांच्या घराजवळ येऊन धुमाकूळ घातला. रात्री मोठ्याने चित्तकारल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीयुक वातावरण पसरले आहे. टस्कराने रात्रभर गावाशेजारील ऊस, भुईमूग पिकात धुडगूस घातला. घाटकरवाडी परिसरातील टक्कर हत्ती देवर्डे परिसरात दाखल झाला आहे.
वेळवट्टी, हाळोली व देवर्डे परिसरात गेल्या काही दिवसांपासून टस्कर हत्तीकडून पिकांच्या नुकसानीचे सत्र सुरूच आहे. त्यांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण झाले आहेत. रात्री टस्कराच्या चित्तकारण्याने व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बाळू आढाव यांनी बॅटरीचा प्रकाशझोत टाकला. त्यांच्यासमोरच टस्कर नारळाचे झाड मोडत होता.
भीतीने ते घरात गेले. वनविभागाला माहिती दिली. टस्कराला हुसकाविण्यासाठी वनविभागाने सुरबाण सोडून हुसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत टक्कर हत्तीचा धुडगूस सुरूच होता. टस्कराने विजय तानवडे यांच्या शेतातील ऊस पिकाचेही नुकसान केले आहे.