आजरा : आजरा तालुक्यात तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर ‘टस्कर’ हत्तीचे पुनरागमन झाले आहे. धनगरमोळा, आवंढी, गवसे परिसरातील अनेकांना या टस्करांचे दर्शन झाले. हत्तीच्या पुनरागमनामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी रात्री धनगरमोळा येथील शेटके यांच्या कुंभारहळ नावाच्या शेतात वीज वितरणचे अभियंता पी. ए. शेटगे, सोमनाथ शेटगे, वाय. के. देसाई, एन. एस. सुतार, पी. एस. गंगापुरे, आदींनी टस्कर हत्तीला पाहिले. हत्तीने मारुती शेटगे, आनंदा शेटगे, अर्जुन शेटगे यांच्या धनगरमोळा येथील ऊस पिकाचे मोठे नुकसान केले.शुक्रवारी सकाळी आवंढी धनगरवाड्यावरून सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास यमुबाई बमू गावडे व गंगुबाई सखू शेळके या धनगर समाजातील महिला आजऱ्याकडे आठवडा बाजारासाठी येत असताना डोंगर उतारावर त्यांना हत्तीने जवळून जात असल्याचे दिसले.हत्ती दिसल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत त्या दोघींनी तेथून पळ काढला. हत्तीने परिसरात शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या परिसरात हत्तींचा वावर वाढला असून, त्यावर वन खात्याने कायमस्वरुपी उपाय योजना करावी अशी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, वनखात्याने हत्तीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. हत्तीपासून सुरक्षित अंतरावर राहण्याचा सल्लादेखील देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
आजरा तालुक्यात टस्कराचे पुनरागमन
By admin | Updated: May 29, 2015 23:49 IST