लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गत गळीत हंगामातील ऊस बिलापोटी पाचशे रुपयांचा हप्ता साखर कारखान्यांनी द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखान्यातून साखर वाहने सोडणार नाही, अशी भूमिका घेत गुरुवारी शिरोळ-जयसिंगपूर मार्गावर साखर घेऊन जाणारे तीन ट्रक कार्यकर्त्यांनी अडविले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी दगडफेक करून ट्रकच्या काचा फोडल्या.सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे ते मुंबई आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. २० मे रोजी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना गत गळीत हंगामातील उसाला पाचशे रुपयांचा हप्ता द्यावा, अशा मागणीचे निवेदन दिले होते. तरीदेखील कारखान्यांनी याची दखल घेतली नसल्याने बुधवारी रात्री कुरुंदवाड येथे साखर घेऊन जाणारे दोन ट्रक अडविण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास दत्त-शिरोळ कारखान्यातून साखरेचे तीन ट्रक जयसिंगपूरकडे येत असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली होती. जिरगे पेट्रोल पंप ते केपीटी या दरम्यान सुमारे पन्नासहून अधिक कार्यकर्ते जमा झाले. यावेळी साखर वाहतूक करणारे ट्रक क्र. आरजे १९ जीई ८३५७, आरजे १९ जीई ६८०७ व आरजे १९ जीई ८५१७ असे तीन ट्रक अडविण्यात आले. घोषणा देत ट्रकवर दगडफेक केली. यामध्ये तीनही ट्रकच्या समोरील काचांचा चक्काचूर झाला. ट्रकच्या चाकातील व्हॉल्व्ह तोडण्यात आले. घटनास्थळी शिरोळ पोलिसांनी येऊन पंचनामा केला.दरम्यान, सध्या साखरेला चांगला भाव आहे. २० तारखेला कारखान्यांना ऊस बिलापोटी शेतकऱ्यांना पाचशे रुपयांचा हप्ता द्यावा, याबाबत निवेदन दिले होते. कारखान्यातील साखर बाहेर पडली तर वाहने रोखणार, असा इशारा देखील दिला होता. तरी देखील साखरेची वाहने सोडण्यात आल्याने आम्ही गुरुदत्त व दत्त कारखान्याची वाहने रोखली. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्यास आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा जि. प.चे माजी सदस्य सावकार मादनाईक यांनी दिला.वाहनांवर वॉचउसाचा दुसरा हप्ता मिळेपर्यंत एकही वाहन बाहेर पडू देणार नाही, असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. पुणे-मुंबई आत्मक्लेश आंदोलन खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या आंदोलनात कार्यकर्ते सहभागी असले तरी साखर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वॉच ठेवण्यासाठीही स्वाभिमानीचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.
साखरेचे ट्रक अडवून काचा फोडल्या
By admin | Updated: May 26, 2017 00:48 IST