कोल्हापूर : देश-विदेशी सहलींच्या नावाखाली बुकिंग करणाऱ्या ग्राहकांचे धनादेश मित्राच्या नावे वटवून निसर्ग टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स व एसओटीसी कंपनीला सुमारे ५ लाख ५८ हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी कंपनीच्या महिला व्यवस्थापकासह एकास सोमवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित व्यवस्थापक स्नेहा दिलीप सातपुते (वय २६, रा. सुभाषनगर) व जयदीप शेळके (३५, उद्यमनगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, समीर सुभाष शेठ (रा. महाडिक माळ) यांचे दाभोळकर कॉर्नर येथे निसर्ग टुर्स अॅन्ड ट्रव्हल्स कंपनी आहे. या कंपनीच्या कार्यालयात एस.ओ.टी.सी. या कंपनीचे व्यवस्थापकपदी संशयित स्नेहा सातपुते काम पाहात होती. देश-विदेश सहलींसाठी बुकिंग करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून पैसे भरून घेण्याचे काम ती करीत होती. यावेळी ग्राहक धनादेशाद्वारे बुकिंग करीत असत. त्यातून ही फसवणूक झाली आहे. गोव्यामध्ये अटक कंपनीला गंडा घालून मिळालेले पैसे घेऊन संशयित स्नेहा सातपुते व जयदीप शेळके हे गोव्याला पळून गेले. याठिकाणी आलिशान हॉटेलमध्ये राहून त्यांनी सर्व पैसे चैनीवर खर्च केले. मोबाईल कॉल डिटेल्सवरून ते गोव्यात असल्याचे समजताच पोलिसांनी त्यांना तेथील हॉटेलवर रंगेहात पकडून अटक केली.
ट्रॅव्हल्स कंपनीला साडेपाच लाखांचा गंडा
By admin | Updated: July 14, 2015 01:14 IST