पोपट पवारकोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला स्वस्तात विमानसेवा सुरू झाल्यानंतर कोल्हापूरकर पुरते हरखून गेले होते. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. आता कोल्हापुरातून मुंबईला जाणे म्हणजे दुबईला जाण्यापेक्षाही महाग झाले आहे. ज्या विमान कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू आहे, त्या कंपनीने १७ ते १८ हजार रुपये असे अव्वाच्या सव्वा प्रवासी तिकीट दर केल्याने कोल्हापुरातील प्रवाशांना पुन्हा एकदा ट्रॅव्हल्स, रेल्वेचा पर्याय स्वीकारण्याची वेळ आली आहे.
कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा २०२२ मध्ये सुरू करण्यात आली. या सेवेमुळे सर्वसामान्य प्रवाशांबरोबर उद्योजक, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांना मुंबईतील एखादे काम आटपून त्याच दिवशी परत कोल्हापुरात येता येते. याचे दरही सुरुवातीच्या काळात अडीच हजार रुपयांच्या आसपास असल्याने प्रवाशांचा या सेवेला उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, याच संधीचा फायदा घेऊन संबंधित विमान कंपनीने हेच दर वाढवले आहेत. परिणामी, कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ज्यांना हे दर परवडणारे नाहीत, असे प्रवासी रेल्वे किंवा ट्रॅव्हल्सने मुंबई गाठत आहेत.देशात कुठेच नाहीत इतके दरदेशांतर्गत प्रवासात पूर्ण भारतात विमानाचे इतके दर कुठेच नाहीत. मुंबई-दुबई या मार्गावरही अगदी दहा हजारांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत दर आहेत. जास्त अंतर असणाऱ्या विमानसेवेचे दर कमी असताना, कमी अंतर असूनही कोल्हापूर-मुंबई या सेवेचे दर मात्र चढेच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
केंद्राच्या उद्देशालाच हरताळ, तिकीट दर चढेचकेंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई ही सेवा सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना विमानप्रवास सुलभ व्हावा, यासाठी केंद्राने ही योजना वसुरू केली. मात्र, कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी सर्वसामान्यांनाच काय श्रीमंतानांही आता परवडणारे नाही, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर-मुंबई या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद असल्याने येथे दुसरीही सेवाही सुरू होऊ शकते. त्यासाठी इतर कंपन्यांनीही परवानगी मागितली असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही.असे आहेत तिकीट दरकोल्हापूर-मुंबई (वेळ : ४० मिनिट) -१७-१८ हजारमुंबई-दुबई (१.४० मि.)-१०-१५ हजार
सध्या मात्र, कोल्हापूर-मुंबई या विमानाचे तिकीट १८ ते २० हजार रुपये आहे. या तिकीट दराबद्दल लोकप्रतिनिधी, अधिकारी कोणीच बोलत नाहीत हे दुर्दैवी आहे. सवलतीच्या दरातील सुरुवातीची ५० टक्के तिकीट आधीच एजंटामार्फत बुक केली जातात. नंतर ती रद्द करण्यात आली असे दाखवून तीही पुन्हा १८ ते २० हजार रुपयांना विकली जात आहेत. - व्ही. बी. पाटील, जिल्हाध्यक्ष-शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोल्हापूर.