शिरोळ : शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत; तर एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक होत असल्याने वाहनधारकांसह नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारे पोलीस कर्मचारी दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.
तालुक्याच्या या शहरात शासकीय कामानिमित्त दररोज नागरिकांची ये-जा असते. नृसिंहवाडी येथे दत्तदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तितकीच मोठी गर्दी असल्याने जयसिंगपूर तसेच मिरजहून येणाऱ्या भाविकांना शिरोळ येथूनच जावे लागते. त्यातच सध्या गळीत हंगाम सुरू असल्याचे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्याही तितकीच आहे.
शहरातील पद्माराजे विद्यालयासमोरून गेल्या अनेक वर्षांपासून एकेरी मार्गाचा वापर केला जातो. अनेक सामाजिक संस्थांकडून वन-वे तोडणाऱ्या वाहनधारकांना गांधीगिरी पद्धतीने आवाहन करून जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतर वाहतुकीला शिस्त लागली होती. मात्र, सध्या नृसिंहवाडीकडून अर्जुनवाडकडे जाणाऱ्या मार्गावर दुहेरी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे; तर वन-वे तोडून अनेक चारचाकी वाहने पोस्ट कार्यालयासमोरून येत असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. शिवाय, बेशिस्त पार्किंगबाबत पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
------------------
वाहतूक व्यवस्था कोलमडली
शिरोळ पोलीस ठाण्याकडे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी आहेत. मात्र, हे पोलीस शहरात कमीच दिसून येतात. अर्जुनवाड-मिरज रोड, औरवाड फाटा या ठिकाणी अर्थ शोधला जात असल्याने वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळेच वाहतुकीची व्यवस्था कोलमडली आहे.
फोटो - ३१०१२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ शहरात अशा प्रकारे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते.