पन्हाळा: पन्हाळगड पहायला येणारे पर्यटक गडाची तटबंदीचे दगड दरीत टाकून असुरी आनंद व्यक्त करत आहेत. या प्रकाराकडे पुरातत्व व पोलीस विभागाचे अक्षम्य दुर्लक्षामुळे पुसाटी बुरुजाजवळील बऱ्यापैकी तटबंदी उध्वस्त झाली आहे. पन्हाळगडावर सध्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. येणारे पर्यटक गडाचा इतिहास बघण्यापेक्षा त्याची नासधूस करण्यात मग्न असुन बहुतेक ठिकाणी पुरातत्व व पोलीस गस्त नसल्याने तटबंदीचे दगड खाली दरीत ढकलून असुरी आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. खरतर तटबंदीचे मोठे दगड खाली ढाकलणे तीतके सोपे नाही म्हणजे हे पर्यटक निश्चितच नशा करून हे कृत्य करत आसणार मग गडावर नशा बंदी आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो पुसाटी बुरुजा जवळ पोलीसांच्या दोन चौक्या तानपीर व निमजगा परीसरात आहेत.
तेथील पोलीसांनी पुसटी बुरुज परीसरात दिवसात शक्यतो दुपारच्या वेळात गस्त घातली तर हे भ्याड कृत्य करणारे मिळून येतील तसेच पुरातत्व विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना तैनात केले, तर तटबंदी उध्वस्त करणारी मंडळी सापडतील पण हे घडत नाही. गुरुवारी सकाळी पन्हाळ्यावरील सकाळी फिरायला जाणाऱ्या स्थानिक लोकांच्या निदर्शनास तटबंदीचे दगड काढल्याचा व खाली दरीत टाकल्याचा प्रकार लक्षात आला. याबाबत पुरातत्वचे विभागीय अधिकारी विजय चव्हाण यांना विचारले असता ते या प्रकारा बाबत अनभिज्ञ असल्याचे सांगून तातडीने तटबंदीचे खाली पडलेले दगड वर आणुन दुरुस्ती करुन घेत असल्याचे सांगितले, तसेच छत्रपतींच्या गडाची नासधूस करणाऱ्या पर्यटकांनी पन्हाळगडावर येवू नये असेही आवाहन केले. तसेच पन्हाळ्यावरील स्थानिक लोकांच्या लक्ष देण्यामुळे गड सुस्थितीत राहात असल्याचे चव्हाण यांनी मान्य केले.