रमेश पाटील -- कसबा बावडा --आचारसंहिता पथकाच्या डोळ्यात धूळफेक करून जाऊळ, वाढदिवस, बारशाच्या नावाखाली ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासून जेवणावळीला ऊत आला होता. परंतु, उद्या, बुधवारी मतदान झाल्यानंतर या जेवणावळी बंद होणार असल्याने कार्यकर्त्यांना आपआपल्या घरीचे जेवावे लागणार आहे. त्यामुळे रोज तांबड्या-पांढऱ्यावर ताव मारणाऱ्या काही कार्यकर्त्यांना घरचे जेवण काही दिवसतरी ‘चवीचे’ लागणार नाही, अशी शक्यता आहे.आपला कार्यकर्ता प्रामाणिकपणे राबला तरच आपला प्रचार जोरात होणार, हे गृहीत धरूनच उमेदवारांनी सर्वांत जास्त काळजी आपल्या कार्यकर्त्यांची घेतली. प्रचारासाठी सकाळी घरातून बाहेर पडलेला कार्यकर्ता भुकेने व्याकूळ होऊ नये, म्हणून त्याच्या चहा-पाणी, नाष्टा, जेवणाची सोय करण्यात आली होती. जेव्हा भूक लागेल तेव्हा कार्यकर्त्याला खायला पोटभर मिळत असे. रात्री प्रचार करून दमून आलेल्या कार्यकर्त्यांची सोय तर चांगलीच होत असे. तांबडा-पांढरा रस्सा, मटण, चिकन, बिर्याणी त्यानंतर ‘स्विट डिश’ही दिली जात असे. काही तळिरामांचीही सोय त्यांच्या आवडी-निवडीच्या ब्रँडनुसार होत असे. प्रचार संपल्याने या जेवणावळीचे प्रमाण काहीसे कमी जाले आहे. उद्या मतदान झाल्यानंतरच्या रात्रीपासून तर कार्यकर्त्यांना घरीच जेवावे लागणार आहे. कार्यकर्त्यांना दररोज जेवण मिळत असे. मतदारांना मात्र त्या-त्या परिसरातील पार्टीच्या वेळीच जेवण मिळत असे. मतदारसंघात जेवढे उमेदवार जास्त तेवढी मतदारांची चंगळ जास्त अशी स्थिती होती. दरम्यान, रोज मांसाहारी जेवण, चहा-नाष्टा, दारूची रेलचेल असे सर्व काही फुकटात खाण्या-पिण्याची सवय जडलेल्यांना आता निवडणुकीनंतरचे काही दिवस जड जाणार आहेत. त्यांना घरचे जेवण बेचव लागणार आहे.
आजपासून जेवायचं आपआपल्या घरात...!
By admin | Updated: October 14, 2014 23:26 IST