कोल्हापूर : माता ही आपल्या मुलांच्या भल्यासाठी अखंडितपणे काम करीत असते; पण समाजातल्या शोषित, उपेक्षित, वंचित घटकांमध्ये आनंद वाटण्याचे काम करणाऱ्या आणि त्यामध्ये समाधान मानणाऱ्या माउलींची समाजाला आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी केले.विद्यापीठातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी कोल्हापुरातील महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, बीसीयुडीचे संचालक डॉ. आर. बी. पाटील, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील उपस्थित होते.कुलगुरू डॉ. भोईटे म्हणाले, प्रत्येक माता आपल्या मुलांच्या आनंदात सुख, समाधान मानत असते; पण कर्मवीरांच्या पत्नी लक्ष्मी यांच्यासारख्या माउलीची आज गरज असून, लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या महिलांनी या माउलीची भूमिका बजावावी.यावेळी कुलगुरू डॉ. भोईटे यांच्या हस्ते ‘लोकमत’च्या पत्रकार इंदुमती गणेश, प्रिया सरीकर, अनुराधा सरनाईक-कदम, जान्हवी सराटे, अहिल्या परकाळे, श्रद्धा जोगळेकर, अश्विनी टेंबे, पूजा मराठे, सुनंदा मोरे, सुरेखा पवार यांचा ग्रंथ, दैनंदिनी व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारिता व संवादशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. निशा पवार, सुमेधा साळुंखे, आदींसह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, महिला सेवक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बीसीयुडीचे संचालक डॉ. आर. बी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
समाजाला आज माउलींची गरज
By admin | Updated: March 9, 2015 23:50 IST