कोल्हापूर : विशाळगड येथील अतिक्रमण या विषयावर गुरुवारी (दि. १६) दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात वनविभाग, पुरातत्त्व विभाग, गटविकास अधिकारी, शाहूवाडी-पन्हाळा तहसीलदार यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीला सोमवारी दिले.
विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे आणि गडकोट यांची दुरवस्था याबाबत विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने १९ मार्च रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची घेतली होती. त्यांनी मी स्वत: पाहणी करतो. तसेच यावर पुरातत्त्व खात्याचे स्पष्टीकरण मागवू. अतिक्रमण काढण्यास पुरातत्त्व खात्याची तयारी असल्यास आम्ही पोलीस बंदोबस्त पुरवू व त्याबाबत राज्य संचालकांशी बोलू’’ असे आश्वासन दिले होते. याचे स्मरण पत्र सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, किशोर घाटगे, शशिकांत बिडकर, समितीचे सदस्य प्रमोद सावंत, बाबासाहेब भोपळे, मधुकर नाझरे उपस्थित होते.
---