कोल्हापूर : टिंबर मार्केटमधील गंजीमाळ येथे घरावर तलवार हल्ला करून, वाहनांची मोडतोड केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी शनिवारी आणखी तीन संशयित तरुणांना अटक केली. गणेश शेखर सोनुले (वय २५, रा. मैलखड्डा, निर्माण चौक), योगेश शामराव चौगुले (२७, रा. जुना गुरांचा बाजार, आठ नंबर शाळानजीक), सूरज लक्ष्मण भोसले (२४, रा. कनाननगर, झोपडपट्टी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यामुळे अटक केलेल्यांची संख्या १६ वर पोहोचली आहे.
दरम्यान, हल्लाप्रकरणी दि. १३ एप्रिलला अटक केलेल्या आठ संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यांना शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यापैकी सूत्रधार बंडा लोंढे व विशाल लोंढे यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.
गंजीमाळ परिसरात पूर्ववैमनस्यातून शनिवारी (दि. १०) दोन गटांत वाद झाला. त्यात कार्यालयाची तोडफोड केली. वादाचे पडसाद सोमवारी (दि. १२) उमटले. सुमारे २० ते २५ हल्लेखोरांनी गंजीमाळमधील ओंकार जाधव याच्या घराची व परिसरातील १२ ते १५ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी १९ जणांवर गुन्हा नोंदविला. एकूण १३ जणांना अटक करून पोलीस कोठडीत रवानगी केली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता बंडू लोंढे व विशाल लोंढे यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली, तर इतरांना न्यायालयीन कोठडी दिली.
दरम्यान, शनिवारी गणेश सोनुले, योगेश चौगुले, सूरज भोसले या तिघांना अटक केली. आतापर्यंत एकूण १६ जणांना अटक केली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.