कोल्हापूर : लाडक्या गणपती बाप्पांना मंगळवारी जड अंत:करणाने निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. सकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसाची तमा न बाळगता दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक भान बाळगत कोल्हापूरकरांनी पंचगंगा नदी घाट वगळता कृत्रिम कुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. कोल्हापूर शहरात ५० हजार तर जिल्ह्यात ३ लाख अशा साडेतीन लाख गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले तर शंभर टक्के म्हणजेच १४० टन निर्माल्य दान झाले.पुरोगामी विचारांच्या कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन हा फक्त आदर्श निर्माण केला नाही तर त्याला आपली जीवनशैली बनवली आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्यावतीने कृत्रिम कुंडातील विसर्जनाची व्यवस्था केली जातेच पण सुजाण कोल्हापूरकर स्वत:हून आपली गणेशमूर्ती कुंडात विसर्जित करून प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद देतात.मंगळवारी महापालिकेच्यावतीने शहरातील चौकाचौकांत व ठिकठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच आरतीसाठी टेबल मांडण्यात आली होती. कोल्हापूर शहरच नव्हे तर आर. के. नगर, पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी अशा उपनगरांमध्येदेखील विसर्जनाची उत्तम सोय करण्यात आली होती.दुपारनंतर घराघरांत देवाची शेवटची आरती झाल्यानंतर एक-एक गणेशमूर्ती विसर्जनासाठी येऊ लागली. टेबलावर गणपतीची आरती करून गणेशमूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन केले जात होते. विसर्जित मूर्ती सुरक्षित ठिकाणी एकत्र ठेवण्यात येत होत्या तर निर्माल्य संकलनासाठी वेगळी सोय केली होती. विसर्जित गणेशमूर्ती नेण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलींची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील सर्व रस्त्यांवरील चौकाचौकांमध्ये, गल्लीबोळांच्या कोपऱ्यांवर भाविकांची कृत्रिम कुंडात गणेश विसर्जनासाठी माेठी गर्दी झाली होती.
वाचा- कोल्हापुरात बॅरिकेट्स तोडून पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन, गणेशभक्तांची अधिकाऱ्यांशी वादावादीशहरातील रंकाळा, कळंबा, राजाराम बंधारा, काेटितीर्थ या जलाशयांमध्ये अपवादवगळता एकही गणेशमूर्ती विसर्जित झाली नाही. त्याशिवाय जिल्ह्यात ग्रामीण भागातदेखील जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्यावतीने पर्यावरणपूरक विसर्जनाची सोय केली होती. त्या-त्या गावातील वापरात नसलेल्या जलकुंडात मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी ठाण मांडून होते त्यामुळे पर्यावरणपूरक विसर्जनाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
शाब्बास, ग्रामीण भागातून ३ लाखांवर गणेशमूर्तींचे संकलनकोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींनी चोख नियोजन केल्यामुळे बाराही तालुक्यातून संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुमारे ३ लाख गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. या उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे. ग्रामीण भागातील जनतेने जिल्हा परिषदेचा हा पर्यावरणपूरक उपक्रम मनापासून स्वीकारल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.या उपक्रमांतर्गत एकूण २ लाख ९० हजार ७४८ मूर्तींचे संकलन करण्यात आले. रात्री आठपर्यंत हीच संख्या तीन लाखांवर गेली. ४९२ टन निर्माल्यही संकलित करण्यात आले असून २ हजार ९३१ मूर्तींचे नागरिकांनी घरीच विसर्जन केले आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्ह्यातील जलस्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने सन २०१५ पासून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्तिकेयन एस. यांनी चंदगड तालुक्यातील शिनोळी व महिपाळगड या गावांना भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यादेखील उपस्थित होत्या. अतिशय दुर्गम असा हा भाग असून ही येथील ग्रामस्थांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या उपक्रमासाठी सर्व गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी, तसेच ग्रामपंचायत स्तरावरून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे, ग्रामस्थांचे सहकार्य केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले हाेते.ग्रामपंचायतींचे चोख नियोजनआपल्या गावातील पाणी साठे आपणच स्वच्छ ठेवले पाहिजेत ही भावना रुजल्याने ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांच्या सहकार्याने चोख नियोजन केल्याचे गावोगावी दिसून येत होते. ठिकठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने गणेशमूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.विभागप्रमुख प्रत्येक तालुक्यातजिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांना या उपक्रमासाठी प्रत्येक तालुक्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार हे विभागप्रमुख बाराही तालुक्यात हजर होते. त्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन सर्वांना पाठबळ दिले तर ग्रामस्थांचे कौतुक केले.