कोल्हापूर : कुटुंब प्रमुख पती-पत्नी दोघंही शिक्षक म्हणून निवृत्त झालेले, दोन्ही मुलांना चांगली नोकरी, मुलगी, सुना, नातवंडे यांनी घर कसं आनंदानं भरलेलं, सुखा-समाधानानं फुललेलं. सगळं कसं मनासारखं चाललं होतं. पण, या आनंदी गोकुळाला कोरोनाचं ग्रहण लागलं आणि एका महिन्याच्या आतच अचानक एखाद्या वादळानं घर उद्ध्वस्त व्हावं तसं झालं. घरातील तीन कर्ते पुरुष गेले. घर उघड्यावर पडले. सानेगुरुजी हौसिंग सोसायटीमधील म्हेतर कुटुंबावर कोरोनाने हा घाला घातला आहे.
शिवाजीराव एकनाथ म्हेतर (वय ७८) महानगरपालिकेच्या शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या पत्नी विजया (वय ६५) या सुद्धा प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा प्रशांत हा दि.२ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला. सौम्य लक्षणे असल्यामुळे त्याला सानेगुरुजी येथील मैत्रांगण कोविड सेंटरमध्ये उपचारांकरिता दाखल करण्यात आले. पुढे दि. ८ मे रोजी शिवाजीराव यांना कोरोनाने गाठलं. पाठोपाठ त्यांच्या पत्नी विजया यांचा कोरोना चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. दोघांनाही कसलीच लक्षणं नव्हती, तरीही खबरदारी म्हणून राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कुटुंबावरील संकट आणि कोरोनाचे भय इथंच संपलं नाही तर दिवसागणिक वेगाने वाढत गेले. शिवाजीराव यांचा मुलगा श्रीकांत व मुलगी वैशाली यांनाही कोराेनाची लागण झाली. श्रीकांत यास राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात, तर वैशाली घरीच राहून उपचार घेतले. एका घरातील पाच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत असल्यामुळे अन्य कुटुंबीय, नातेवाईकांची प्रचंड धावपळ उडाली. कोरोनामुळे शिवाजीराव, प्रशांत, श्रीकांत यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली आणि म्हेतर कुटुंबावर एक एक आघात होत गेले. शिवाजीराव यांचे दि. १२ मे रोजी, तर प्रशांत यांचे दि. १६ मे रोजी निधन झाले. त्यानंतर, गुरुवारी (दि.२७ मे) श्रीकांतचे निधन झाले.
एकाच घरातील तीन कर्त्या पुरुषांचा एका पाठोपाठ एक मृत्यू होणे या म्हेतर कुटुंबीयांवर ओढवलेल्या वेदनादायी प्रसंगाने परिसरातील नागरिक, नातेवाईक तसेच अन्य कुटुंबीय हादरून गेले आहेत. एक सधन, सुशिक्षित कुटुंबाची कोरोनामुळे वाताहात झाली. घरातील प्रमुख पुरुष गेल्याने म्हेतर कुटुंब उघड्यावर पडले आहे.
-उपचारात हयगय झाल्याचा आरोप-
शिवाजीराव व श्रीकांत यांना ज्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, तेथील डॉक्टरांकडून उपचारातील हयगयीमुळे आमच्यावर ही आफत ओढवल्याचा आरोप म्हेतर कुटुंबीयांनी केला आहे. रुग्णालयाचे बिल सांगतील तसे दिले, रेमडेसिविर इंजेक्शनन आणून द्या म्हणून सांगताच १० इंजेक्शन तत्काळ आणून दिली त्यातील एकच वापरले बाकीच्या इंजेक्शनचा त्यांनी वापरच केला नाही. शिवाजीराव यांच्याबाबतीत होत असलेली हेळसांड श्रीकांतने पाहिली होती. त्यांचा मृत्यू होताच मला या रुग्णालयातून हलवा, अशी विनंती केली. त्यामुळे श्रीकांतला गंभीर परिस्थितीत सीपीआर रुग्णालयात दाखल करावे लागले, असे कुटुंबीयांनी सांगितले.
-जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार-
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आमची कर्ती माणसं गेली आहेत, अन्य रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांवर असे कटू प्रसंग येऊ नयेत अशी आमची भावना आहे. संबंधित डॉक्टर, रुग्णालय यांच्या विरोधात जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही म्हेतर कुटुंबीयांनी सांगितले.