कऱ्हाड : ‘राज्य शासनाने ‘एफआरपी’ प्रमाणे ऊसदर देण्याची व असा दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची भूमिका घेतली असतानाही काहींना केवळ काँग्रेस व राष्ट्रवादीला खूश करण्यासाठी यावर्षी ऊसदर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे़ त्यांनी खुशाल आंदोलन करावे,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली़ येथील प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी मंगळवारी सदाभाऊ खोत हे अभिवादन करण्यासाठी आले होत़े़ यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यावर्षी ऊसदराबाबतची भूमिका जाहीर केली़ खोत म्हणाले, ‘एफआरपीप्रमाणे ऊसदर मिळावा आणि जे कारखानदार देणार नाहीत, त्या कारखानदारांवर राज्य शासनाने कारवाई करावी, हीच मागणी घेऊन आम्ही मागील वर्षी कऱ्हाड तालुक्यातील पाचवडेश्वर येथे आंदोलन सुरू केले होेते. मात्र, त्यावेळी शेकडो शेतकऱ्यांवर लाठीमार झाला़ राज्य शासनाने शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले़ यावर्षीही आम्ही एफआरपीप्रमाणे दर देण्याची मागणी केली़ राज्य शासनाने ही मागणी मान्य केली असून, एफआरपीप्रमाणे जे कारखानदार दर देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे़ राज्य शासन ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने असतानाही काहीजण केवळ काँग्रेस व राष्ट्रवादीला खूश करण्यासाठी ऊसदर आंदोलन करणार असल्याचे सांगत आहेत़ त्यांनी असे आंदोलन खुशाल करावे़’ असे त्यांनी सांगितले (प्रतिनिधी)
त्यांनी खुशाल आंदोलन करावे : सदाभाऊ खोत
By admin | Updated: November 27, 2014 00:24 IST