विश्वास पाटीलकोल्हापूर : एकही आमदार नाही. राज्यात सत्ता नाही. प्रमुख नेते महायुतीच्या गळाला लागलेले... अशा पडत्या काळात महाविकास आघाडीला त्यातही मुख्यत: काँग्रेसला वादळात दिवा लावून दाखवावा लागणार आहे. एकेकाळी काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात या पक्षापुढे आणि नेते म्हणून आमदार सतेज पाटील यांच्यापुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुसऱ्या बाजूने विचार केल्यास पक्षाची बांधणी करण्याची, नव्या कार्यकर्त्याला बळ देण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी साधारणत: ५० जागांवर काँग्रेससह महाविकास आघाडीकडे कमी-अधिक ताकदीचे उमेदवार आहेत. आता तरी १८ जागा अशा आहेत की, जिथे त्यांना महायुतीतील एखाद्या नेत्याची, गटाची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार, अशा कितीही घोषणा दिल्या तरी या दोन्ही आघाड्यांची जागा लढवतानाच सरमिसळ होण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्याच्या राजकारणात विरोधकांचा एकमेव चेहरा म्हणून सगळी भिस्त आमदार सतेज पाटील यांच्यावरच आहे. स्वपक्षातील जोडण्या लावतानाच घटक पक्ष असलेल्या उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह इतर डावे, पुरोगामी पक्षांना घेऊन त्यांना पुढे जायचे आहे. तालुकानिहाय दौरे काढून कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा, उमेदवारीची चाचपणी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.महाविकास आघाडीत काँग्रेसची करवीर, राधानगरी, शिरोळ, हातकणंगले, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यांत बऱ्यापैकी ताकद आहे. ती ताकद काही मतदारसंघांत चांगली आहे तर काही मतदारसंघांत जेमतेम आहे. एकेकाळी करवीर-राधानगरी काँग्रेसचे बालेकिल्ले होते. परंतु, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर राहुल पाटील लगेच हतबल झाले आणि राष्ट्रवादीत गेल्याने जुन्या सांगरूळमध्ये काँग्रेसपुढे प्रश्नचिन्ह आहे. अशीच स्थिती अन्य तालुक्यांत काही मतदारसंघांत आहे. अशा कमकुवत मतदारसंघांचा काँग्रेसने शोध घेतला आहे. तिथे युतीत काय हालचाली सुरू आहेत, यावर त्यांचे बारीक लक्ष आहे. या मतदारसंघांत युतीतील नाराज उमेदवाराला संधी देणे किंवा युतीतील नेते, गटाशी जुळवून घेण्याचा विचार त्यांना करावा लागणार आहे. उद्धवसेनेची ताकद शाहूवाडीत आहे. पन्हाळा, करवीर, हातकणंगले, शिरोळमध्ये काही मतदारसंघांत त्यांचे पॉकेट आहे. तशीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आहे. या पक्षाकडे समरजित घाटगे यांच्यामुळे कागल हा हुकमी तालुका आहे. शिवाय राजीव आवळे यांच्यामुळे हातकणंगलेत थोडी ताकद आहे. गडहिंग्लजला नंदाताई बाभूळकर विधानसभेला लढल्या. परंतु, त्या निवडणुकीत झालेल्या त्रासाचा वचपा म्हणून त्यांनी भाजपा पुरस्कृत आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
तीन तालुके आंदणच...काँग्रेसने कागल, पन्हाळा, शाहूवाडी हे तालुके सोडूनच दिले आहेत. तिथे संघटनात्मक बांधणीकडे कधीच लक्ष दिलेले नाही. अमर पाटील, डॉ. जयंत पाटील, कर्णसिंह गायकवाड यांच्या वाडवडिलांना काँग्रेसने राजकीय वैभव मिळवून दिले, सत्ता दिली. परंतु, त्यांनी सोयीच्या राजकारणात पक्ष वाऱ्यावर सोडले आहेत. या निवडणुकीत अमर पाटील, डॉ. जयंत पाटील हे काँग्रेसकडून लढण्याची चिन्हे आहेत. कर्णसिंह गायकवाड मात्र आमदार विनय कोरे यांचेच राजकारण बळकट करतील. राजकीय सोयीसाठी काँग्रेसने या तालुक्यांत माणसेच उभी केली नाहीत. (आणि उभी राहू पण दिली नाहीत) कागलमध्ये तर सागर कोंडेकर हे एक नाव सोडले तर काँग्रेसला पोस्टर लावायला माणूस नाही.
शपथा टिकतात कुठंपर्यंत...काही मतदारसंघांत जिथे एकाच पक्षातून तीन-चार इच्छुक आहेत, त्यांना तुम्ही एकत्र बसून चर्चा करा, अशा सूचना दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी दिल्या आहेत. आमच्यातील कुणालाही उमेदवारी द्या, आम्ही एकत्र आहोत, असे इच्छुक सांगत आहेत. एकत्र राहण्यासाठी पाण्याची, भाकरीची, भंडाऱ्यापासून कवड्यांच्या माळेची शपथ घेतात; परंतु या शपथेचा अंमल प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर होईपर्यंतच राहतो. एकदा एकाला उमेदवारी जाहीर झाली की, बाकीचे तिघे कुठे पसार होतात हे कळतही नाही. त्यामुळे आता एकत्र येऊन शपथा घेण्याला तसा फारसा अर्थ नाही.
Web Summary : Kolhapur's Zilla Parishad election sees fluid alliances. Congress faces challenges but also opportunities. Mahavikas Aghadi needs Mahayuti support in some areas. Internal party rivalries complicate matters, testing alliance unity.
Web Summary : कोल्हापुर जिला परिषद चुनाव में गठबंधन अस्पष्ट हैं। कांग्रेस को चुनौतियों का सामना करना पड़ता है लेकिन अवसर भी हैं। महाविकास अघाड़ी को कुछ क्षेत्रों में महायुति के समर्थन की आवश्यकता है। आंतरिक पार्टी प्रतिद्वंद्विता मामलों को जटिल करती है, गठबंधन एकता का परीक्षण करती है।