लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील कोरोना स्थिती गंभीर झाली असून, राज्य सरकार कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याचे दिसत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिंदू चौकातील भाजप शहर कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
पाटील म्हणाले, ‘राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती गंभीर होत आहे. मात्र, त्यावर कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही. मुख्यमंत्री निर्णयच घेत नाहीत. अशा आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्यासाठीचा अनुभव सरकारकडे नाही. त्यामुळे राज्यातील कोरोनाचे संकट अधिक गंभीर होत आहे. अर्णब गोस्वामी प्रकरणामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे महाविकास आघाडीचे हीरो होते. मात्र, आता त्यांना वाईट असल्याचा साक्षात्कार झाला आहे.
‘गोकुळ’बाबत विचारले असता पाटील म्हणाले, ‘याबाबत समरजित घाटगे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपला दोन जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे.’