उद्धव गोडसेकोल्हापूर : धरणांच्या सुरक्षेसाठी पाटबंधारे विभागाने ८ मार्च २०१८ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार अणदूर धरणालगतची बांधकामे बेकायदेशीर आहेत. थेट पाणी संचय पातळीत असलेल्या एकाही फार्महाऊस मालकाने पाटबंधारे विभागाकडून परवानगी घेतलेली नाही. वारंवार पाठवलेल्या नोटिसांनाही त्यांनी उत्तरे दिलेली नाहीत.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात थेट अतिक्रमण करूनही ग्रामपंचायतीसह कोणत्याच प्रशासकीय यंत्रणेने बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवलेले नाही. यावरून धनदांडगे फार्महाऊस मालक आणि शासकीय यंत्रणांची मिली भगत स्पष्ट होत आहे.निसर्गरम्य परिसरातील अणदूर धरणाला पडलेला अतिक्रमणांचा विळखा ‘लोकमत’ने उघडकीस आणताच जिल्ह्यातील सर्वच धरणे, तलाव आणि जलाशयांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला आहे. अणदूर धरणालगत असलेली सर्व बांधकामे बेकायदेशीर असल्याची कबुली ग्रामपंचायतीने ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, त्यावर नोटिसा देण्याशिवाय कोणतीच ठोस कारवाई केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.बहुतांश फार्महाऊस मालकांनी आधी बांधकामे केली आणि त्यानंतर परवानगीसाठी अर्ज केले. परवानगी देताना पाटबंधारे विभागाच्या निकषांकडे दुर्लक्ष झाल्याचे सरपंच सरिता पाटील यांनी कबूल केले. मात्र, कारवाईसाठी त्यांनी पाटबंधारे विभागाकडे बोट दाखवले. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांना विचारणा केली असता, त्यांनी अणदूर ग्रामपंचायत आणि संबंधित फार्महाऊस मालकांना अनधिकृत बांधकामांबद्दल नोटिसा पाठवल्याचे सांगितले. यावरून धरणालगतची बांधकामे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
असे आहेत बांधकामाचे निकषद्वारविहित जलाशय : पावसाळ्यातील पाणी संचय पातळीपासून दीड फूट उंचीवर किंवा ६० फूट लांबद्वारयुक्त जलाशय : पावसाळ्यातील पाणी संचय पातळीपासून ३ फूट उंचीवर किंवा २२५ फूट लांबलघु प्रकल्प : पावसाळ्यातील पाणी संचय पातळीपासून २०० मीटर लांबमोठे व मध्यम प्रकल्प : पावसाळ्यातील पाणी संचय पातळीपासून ५०० मीटर लांब
जबाबदारी कोणाची?अणदूर ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे अतिक्रमणांवर कोण कारवाई करणार याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वस्तुस्थितीची माहिती घेऊन अनधिकृत बांधकामे काढण्याचा सक्त आदेश देण्याची गरज आहे.
ग्रामपंचायतीने दिलेली फार्महाऊसधारकांची नावेरविराज पाटील, वेदांतिका माने, वसंतराव भोसले, व्यंकटेश अणदूरकर, भालचंद्र पटेल, मिलिंद रणदिवे, पांडुरंग पाटील, दशरथ गुरव, विक्रमसिंह मुळीक, रोहित पाटील, शिवदास गुरव, वीणा गुरव, सूर्यकांत पाटील, वसंत घाटगे, मनोज शिंदे, विजय देसाई, रुक्साना नदाफ, अमर पाटील, महादेव पाटील, उज्ज्वल नागेशकर, जयवंत पुरेकर, वर्षा पाटील-चौगुले, शामराव पाटील, सोहम शेख, बयाजी पाटील, वसंतराव भोसले, रामू पाटील, वसंत तोडकर, नीलेश खाडे, अमर पाटील, साक्षी बिचकर, संजय चव्हाण, अभिजित भांदिगरे, शिरीष बेरी, हणमंत पाटील, स्मिता साळोखे
पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार धरणालगतची बांधकामे बेकायदेशीरच आहेत. याबाबत आम्ही तातडीने सर्व फार्महाऊस मालकांना नोटिसा पाठवल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत आणि गावसभेत कारवाईचा निर्णय घेऊ. - सरिता पाटील, सरपंच, अणदूर