कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रमुख पहिल्या पाच रुग्णालयांवरील कोरोना स्थितीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना टास्क फोर्सने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला केल्या आहेत.
जिल्ह्यातील १ जानेवारी ते ११ एप्रिलमध्ये झालेल्या मृत्यूमधील ४५ टक्के मृत्यू हे सीपीआर आणि आयजीएम इचलकरंजी येथे झालेले आहेत. त्याखालोखाल डी. वाय. पाटील हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज आणि अस्टर आधार या ठिकाणी मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या पाच रुग्णालयांमधील स्थितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज अहवालात व्यक्त केली आहे.
या पाचही रुग्णालयांमध्ये आवश्यक ते मनुष्यबळ, ऑक्सिजन, औषधांचा पुरवठा करणे व सतत निरीक्षण करणे यामुळे रुग्णालयातील मृत्यूंची संख्या पुढील १५ दिवस ते १ महिन्यांमध्ये ४० ते ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते, असा दावा टास्क फोर्सने केला आहे.
चौकट
कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणाचीही घेतली दखल
टास्क फोर्सने सीपीआर आणि आयजीएम या ठिकाणी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांशीही चर्चा केली. त्यामध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची वर्तणूक उद्धटपणाची असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाशी कर्मचाऱ्यांनी स्नेहपूर्वक वर्तणूक ठेवावी, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चौकट
महिनावर मृत्यूची संख्या
जानेवारी ११
फेब्रुवारी २२
मार्च २७
एप्रिल ४८५
११ मेपर्यंत ५२६
एकूण १०७१
चौकट
क्षेत्रानुसार मृत्यू
कोल्हापूर महापालिका २३४
नगरपालिका क्षेत्र ११३
इतर जिल्हे १८८
ग्रामीण ५३६
एकूण १०७१
चौकट
पहिल्या ७२ तासांत ४३ टक्के मृत्यू
या झालेल्या मृत्यूपैकी ४३ टक्के मृत्यू हे पहिल्या ७२ तासांमध्ये झाले आहेत. हे रुग्ण वेळेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले नाहीत किंवा त्यांची स्थिती गंभीर झाल्यानंतरच त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याचे स्पष्ट होते, असे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.
वेळ संख्या टक्केवारी
२३ तास २३२ २१.६८
४८ तास १२२ ११.४०
७२ तास ११३ १०.५६
९६ तास ८८ ०८.२२
१२० तास ८४ ७.८५
१२० तासांपेक्षा जास्त ४३१ ४०.२८
एकूण १०७१ १००