कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली चित्रपटगृहे उघडण्यासाठी राज्य शासनाने २२ ऑक्टोबरपासून परवानगी दिली असली तरी नवे चित्रपट प्रदर्शित होण्यावर या दिवशी पडदा उघडेल की नाही हे ठरणार आहे. गेल्या दीड वर्षात नव्या चित्रपटांची निर्मिती थांबली, अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे दिवाळीत नव्या चित्रपटांचा धडाका आणि प्रेक्षकांच्या शिट्ट्या वाजणार आहेत.
कोल्हापुरात चालू स्थितीत ११ चित्रपटगृहे आहेत. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यात चित्रपटगृह बंद झाली. पहिली लाट ओसरल्यावर नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आली. पण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये एकही नवा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने परवानगी मिळूनदेखील चित्रपटगृह बंद राहिले. मार्च महिना कसाबसा गेला आणि एप्रिलमध्ये पुन्हा लॉकडाऊन झाले. त्यामुळे अन्य व्यवसाय उद्याेग सुरू झाले तरी चित्रपटगृह दीड वर्ष बंदच राहिली. आता २२ ऑक्टोबरपासून परवानगी मिळाली आहे, त्याला आणखी महिन्याचा कालावधी आहे, तोपर्यंत नवे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखा मिळाल्या तर या दिवशी चित्रपटगृहांचा पडदा उघडेल. गेल्या दीड वर्षात नव्या चित्रपटांची निर्मिती रोडावली आहे, ज्यांची निर्मिती झाली ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत, शिवाय प्रेक्षकांनादेखील मोबाइलवर चित्रपट पाहण्याची सवय लागली आहे. या सगळ्याचा विचार करता बॉक्स ऑफिसवर धमाका करणारे चित्रपट प्रदर्शित झाले तरच चित्रपटगृह पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होतील.
---
शासनाने २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांना परवानगी दिली असली तरी मार्गदर्शक नियमावली अजून आली नाही. चित्रपटगृह सुरू होण्यासाठी आणखी एक महिना असल्याने नवे चित्रपट येतील अशी अपेक्षा आहे.
विक्रम भोसले, मालक, शाहू टॉकीज
-
चित्रपटगृहांना परवानगी देऊन शासनाने या उद्योगासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. आता प्रतीक्षा आहे ती नव्या चित्रपटांची. दीड वर्षात लोकांची अभिरुची बदलल्याने प्रेक्षकांना आकर्षित करू शकतील असे चित्रपट प्रदर्शित झाले पाहिजेत. नाहीतर मग दिवाळीपर्यंत थांबावे लागेल.
गौरी इंगळे, पद्मा टॉकीज
---