कोल्हापूर : अद्ययावत ध्वनी यंत्रणेची सुविधा असलेल्या नाट्यगृहाची गायन समाज देवल क्लबच्या माध्यमातून कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात भर पडणार आहे. ‘गोविंदराव टेंबे रंगमंदिर’ असे नामकरण करण्यात येणारे हे नाट्यगृह २ जानेवारी २०१६ रोजी सिने अभिनेता नाना पाटेकर आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खुले केले जाणार आहे. त्यासाठी नाट्यगृहाच्या पूर्णत्वाची कामे वेगाने सुरू आहे.बदलत्या काळानुसार तांत्रिक सुविधांसह येथील नाट्यगृह अद्ययावत करण्याची गरज होती. ते लक्षात घेऊन क्लबच्या व्यवस्थापनाने ५२५ इतकी आसनक्षमता असलेल्या नाट्यगृहाचे काम सुरू केले. गेल्या तीन वर्षांपासून सभागृहाच्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू झाले. यात पहिल्यांदा बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर नाटकासह गायनमैफलीसाठी ध्वनिव्यवस्था अनुकूल असणे आवश्यक असते. त्यानुसार पूर्ण अद्ययावत नाट्यगृह साकारण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. यातील ५० लाख रुपयांची मदत रसिकाग्रणी गोविंदराव टेंबे यांची पणती ज्योत्स्ना टेंबे-खांडेकर यांनी दिली. या ५० लाख रुपयांच्या मदतीतून नाट्यगृह अद्ययावतीकरण्याच्या कामाला गती मिळाली. यातून पहिल्या टप्प्यात व्यासपीठाचे काम पूर्ण केले जाणार आहे. याबाबतचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नाटक, गायनमैफलींना उपयुक्तनाटक आणि गायन मैफलींवेळी आवाज भिंतीवर थडकून प्रतिध्वनी येणे त्रासदायक ठरते. ते टाळण्यासाठी देवल क्लबमधील नवे नाट्यगृह ध्वनिरोधक (साउंड प्रूफ) असणार आहे. हे अद्ययावत नाट्यगृह प्रयोगशील नाटक, गायन मैफल, महोत्सवांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे देवल क्लबचे कार्यक्रम समिती प्रमुख श्रीकांत डिग्रजकर यांनी सांगितले. ते म्हणाले, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर या कामात केला आहे. त्यामुळे कलाकारांचा मूळ आवाज माईकशिवाय ऐकता येणार आहे. नवे नाट्यगृह हे राजर्षी शाहू स्मारक भवनपेक्षा मोठे आणि केशवराव भोसले नाट्यगृहापेक्षा लहान आहे. ज्योत्स्ना टेंबे-खांडेकर यांच्या मदतीतून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आहे. उर्वरित ५० लाख रुपयांचा निधी लवकरच उभारून व्यासपीठावरील यांत्रिक पडदा, झालरी, विंग आणि बैठक व्यवस्थेचे काम पूर्ण केले जाणार आहे.टेंबे यांचा ऋणानुबंधरसिकाग्रणी गोविंदराव टेंबे यांचा आणि देवल क्लबचा स्थापनेपासूनचा ऋणानुबंध होता. त्यांनी ‘माझा संगीत व्यासंग’सारख्या ग्रंथाचे लेखन केले. संस्थेची जुना देवल क्लब येथील वास्तू उभारली, त्यावेळी टेंबे हे क्लबचे संचालक होते. येथील मैफलींत ते संगीतसेवा देत होते. या क्लबशी असलेला हा ऋणानुबंध लक्षात घेऊन या नाट्यगृहाचे ‘गोविंदराव टेंबे रंगमंदिर’ असे नामकरण केले जाणार असल्याचे डिग्रजकर यांनी सांगितले.
‘देवल क्लब’च्या नाट्यगृहाचा पडदा जानेवारीत उघडणार
By admin | Updated: December 8, 2015 00:40 IST