कोल्हापूर : समस्या सोडविणारे आणि समस्याग्रस्त यांच्यात जगभर मोठी दरी निर्माण झाली आहे. ज्यांच्याकडे समस्या सोडविण्याची भूमिका आहे अशांना ही समस्या आपली आहे, असे वाटतच नाही. ते नेहमी गिऱ्हाईक म्हणूनच त्यांच्याकडे पाहत असून, समस्या सोडविणाऱ्यांमधील आत्मीयता संपल्यानेच जग चिंताग्रस्त बनले आहे, असे प्रतिपादन शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. कैलास सत्यार्थी यांनी मंगळवारी येथे केले.डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. यावेळी बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, शांतादेवी पाटील, कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के, सुमेधा सत्यार्थी, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, डॉ. पी. डी. पाटील, वैजयंती पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी ‘ट्रान्सफार्मिंग हायर एज्युकेशन : अ जर्नी इन टू न्यू डायमेन्शन’ या ग्रंथाचे व ध्यासपर्व या डॉ. संजय डी. पाटील यांच्यावरील जीवनगौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
डॉ. सत्यार्थी म्हणाले, भारताचा खरा विकास तेव्हाच होईल जेव्हा सर्वांना समान शिक्षण मिळेल. त्यासाठी अगदी शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. बालशिक्षण, बालहक्क आणि बालमजुरी या क्षेत्रात देशात सुरू असलेले काम प्रशंसनीय आहे. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवापर्यंत हे काम पूर्णत्वास जाईल. सध्या कधी नव्हे इतके जग अत्याधुनिक बनले आहे, ते श्रीमंत आहे, गतीने धावत आहे. मात्र, त्याच्याइतकेच हे जग संकटात व समस्याग्रस्तही बनले आहे.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, संजय डी. पाटील यांनी शिक्षणाबरोबरच कृषी, आरोग्य क्षेत्रातही मोठे काम केले आहे. वडिलांचा शैक्षणिक, सामाजिक वारसा त्यांनी खऱ्या अर्थाने पुढे नेला.
शाहूंच्या कार्याचा गौरवडॉ. सत्यार्थी यांनी राजर्षी शाहू छत्रपती यांच्या कार्याचा सुरुवातीला गौरव केला. ते म्हणाले, उत्तर भारतात ६० वा वाढदिवस दणक्यात साजरा करतात, इकडे मात्र एकसष्टी करतात. तसेही महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत देशात एक पाऊल पुढेच आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी देशात बालशिक्षणाचा कायदा करून राजर्षी शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थाने प्रगतीचे पाऊल टाकले होते. देशात कोल्हापूर, बडोदा व केरळ या तीनच प्रदेशांमध्ये अशा प्रकारचा कायदा केला गेला. साखर, उद्योग-व्यवसायात कोल्हापूरची भूमी समृद्ध आहे. आता शिक्षणाच्या क्षेत्रातही कोल्हापूर केंद्रबिंदू बनले आहे.
यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, डॉ. के. प्रथापन, डॉ. प्रभात रंजन, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. भालबा विभुते, डॉ. आर. के. शर्मा, अमित विक्रम, प्रताप चव्हाण पाटील, मेघराज काकडे, देवराज पाटील, सुप्रियाताई चव्हाण पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, राजश्री काकडे, भारत पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, पूजा पाटील, वृषाली पाटील उपस्थित होते. आर. के. मुदगल यांनी प्रास्ताविक केले. राधिका ढणाल यांनी सूत्रसंचालन केले. आर. के. शर्मा यांनी आभार मानले.