शिवाजी सावंतगारगोटी : भुदरगड तालुक्यातील नितवडे,दोनवडे, खेडगे या भागातील घनदाट जंगलांतून वाहणाऱ्या आणि मन मोहवणाऱ्या सात धबधब्यांची एक विस्मयकारक रांग पर्यटकांना सुखद अनुभवाची पर्वणी देत आहे.यातील ‘सवतकडा प्रमुख धबधब्यासह इतर सहा धबधबे सध्या पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे.गारगोटीपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर कडगाव-पाटगाव रस्त्यालगत नितवडे गावाच्या हद्दीत हा सवतकडा धबधबा कोसळतो आहे. या ठिकाणी जाणारी रस्त्याची सुलभता,वाटेतील घनदाट दाट झाडीतून मिळणारा हिरवळीचा अनुभव आणि धबधब्याजवळ पोहचल्यावर डोळ्यांचं पारणं फेडणारा प्रपात! हे सर्व मिळून एक अनोखा वर्षा पर्यटनाचा अनुभव मिळतो.
एकाच ठिकाणी सहा धबधबे!सवतकडा हा फक्त एक धबधबा नाही, तर या परिसरात डुक्करकडा, मंडपीकडा,जांभूळकडा, भीमकाय, महाकाय अशा सहा महाकाय धबधब्यांची जणू नैसर्गिक माळ तयार झाली आहे.अतिशय दुर्गम असलेले हे ठिकाण आता प्रवेशयोग्य आणि सुरक्षित बनवण्यात आले आहे. पर्यटक आता एका मार्गावरच या सहाही धबधब्यांचा आनंद घेऊ शकतात.या शिवाय भीवाशिवा कोंड,सागवानचे जंगल आणि या ठिकाणी अनेक सेल्फी पॉईंट निर्माण करण्यात आले आहेत. भिवाशिवा कोंड या ठिकाणी पाण्यातून घसरगुंडी करण्यासाठी कृत्रिम घसरगुंडी करण्यात आली आहे.पण सध्या ओढ्याला पाणी खूप असल्याने पाऊस कमी झाल्यावर याचा आनंद लहान थोरानां घेता येऊ शकतो.
वर्षा पर्यटनस्थळ सर्वच धबधबे एकत्रितपणे सुरक्षित वर्षा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची कल्पना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांची आहे.त्यांच्या पाठपुराव्याने पर्यटन विकास महामंडळ आणि वन विभागाच्या वतीने येथे तब्बल सात कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यापैकी तीन कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून यामध्ये पायऱ्या, लोखंडी साकव, सुरक्षा ग्रील,दिशादर्शक फलक आणि धोक्याच्या ठिकाणी प्रवेशबंदीची व्यवस्था,काही ठिकाणी सुरक्षा रक्षक यामुळे पर्यटकांचे अनुभव अधिक सुखकर आणि सुरक्षित बनले आहेत.
हा संपूर्ण परिसर पूर्वी अतिशय दुर्गम होता. मंत्री आबिटकर यांच्या संकल्पामुळे आता ही जागा ‘सुरक्षित पर्यटनस्थळा’त रूपांतरित झाली आहे.राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो पर्यटक येथे भेट देतात.भविष्यात ही संख्या निश्चितच वाढेल. भुदरगड तालुक्यातील अशी अनेक ठिकाणे अद्याप अज्ञातवासात आहेत.मात्र सवतकड्याच्या विकासामध्ये जे सातत्य दिसतेय, त्यातून मंत्री प्रकाश आबिटकर यांचं पर्यटन विकासाचे स्वप्न आकार घेतंय. हे ठिकाण भविष्यात भुदरगडचा पर्यटन ब्रँड ठरू शकतो. - सर्जेराव पाटील, सरपंच, नितवडे
सवतकडा परिसर हा केवळ धबधबा नव्हे, तर पर्यावरणाचा गाभा आहे. हिरव्यागार जंगलात कोसळणारा पाण्याचा प्रपात, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निरभ्र आकाश यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वर्गीय आनंद मिळतो. आता या ठिकाणी थेट चारचाकी वाहनाने पोहोचता येते. - अविनाश तायनाक, वनपरिक्षेत्र अधिकारी