चंदगड : मला भाजपातून बाहेर काढण्याची भाषा करणारे आमदार शिवाजी पाटील हेच मुळात २०२४ च्या निवडणुकीत अपक्ष निवडून येऊन त्यांनी आमच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांना ही भाषा शोभत नसल्याचे विशेष निमंत्रित प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्राम कुपेकर यांनी पत्रकातून स्पष्ट केले.गेल्या आठवड्यात आमदार पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्याबाबत कुपेकर यांनी पत्रकातून आपली बाजू मांडली. ‘शक्तिपीठ’ महामार्गाला विरोध केला म्हणून मी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली, असे त्यांना वाटते. परंतु, अभीष्टचिंतन सोहळ्यात चिंतन करायला लावणारी वेळ जनतेवर आली आहे.२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार मी माघार घेऊन महायुतीचे उमेदवार माजी आमदार राजेश पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा पक्षादेश डावललेला नसल्याने त्यांच्या आरोपात तथ्य नाही.
..अन्यथा राजीनामा द्यावा लागेलसंवैधानिक पदावर राहून असंसदीय भाषा त्यांना शोभत नाही. टीका केलेली आम्ही सर्वमंडळी गेली २५ वर्षे चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्याच्या जडणघडणीत योगदान देत आहेत. त्यावेळी तुम्ही कुठे होता, काय करत होता, याविषयी माहिती घ्यावी लागेल आणि तुमचा मागील इतिहास काढला तर तुम्हाला तुमच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशाराही कुपेकर यांनी दिला.
माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राजकीय मुद्द्यावरून मी जी टीका-टिप्पणी केली ती माझ्यावरील आरोपांना प्रत्युत्तर होते. त्यातून कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. माझा पिंड राजकीय नसून पोटात एक आणि ओठात एक अशा स्वरूपाचे बोलणे मला जमत नाही. विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यामुळे नैसर्गिक स्वभावानुसार त्याला उत्तर दिले. - शिवाजी पाटील, आमदार