राम मगदूम
गडहिंग्लज : झिरमीट पावसात दुचाकीवरून घरी जाताना समोरून आलेल्या वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशाने त्यांचे डोळे दिपले अन् घात झाला. दुचाकीवरून पडलेल्या कष्टाळू शेतकऱ्याचा दुर्देवी अंत झाला. रूद्रगोंडा बाबूराव पाटील (वय ४८, रा. ऐनापूर, ता. गडहिंग्लज) असे त्यांचे नाव आहे.हकीकत अशी, रूद्रगोंडा हे प्रयोगशील शेतकरी. घरची शेती स्वत:च कसण्याबरोबरच इतरांची शेती त्यांनी खंडाणे कसायला घेतली आहे. ऊस, भातासह भाजीपाला उत्पादन व दुभत्या जनावरांवरच संसाराचा गाडा ओढत होते. दरम्यान, त्यांना हर्षदा उर्फ किर्ती व दुर्वा अशा दोन मुली झाल्या. मात्र, मुलगा-मुलगी भेद न करता त्यांना चांगले शिकवायचे, स्वत:च्या पायावर उभे करायचे असा चंगच त्यांनी बांधला. मुलीदेखील हुशार असल्यामुळे खाजगी अकॅडमीत घालून त्यांची नवोदय प्रवेशाची तयारी करून घेण्याचा निर्णय घेतला.किर्तीला कागलच्या नवोदय विद्यालयात पाचवीला प्रवेश मिळाला होता. नुकतीच ती दहावी उत्तीर्ण झाली आहे. दुर्वादेखील नवोदयची तयारी करीत असून किर्तीच्या अकरावी प्रवेशासाठी ते दुचाकीवरून कागलला गेले होते. परंतु, घरी परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, बहिण, दोन भाऊ असा परिवार आहे. गडहिंग्लज पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
अन्य शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन !रूद्रगोंडा यांनी बारावीनंतर कांहीवर्षे कोल्हापूरच्या एमआयडीसीत नोकरी केली. मात्र, लग्नानंतर ते शेतीतच रमले. सेंद्रीय शेतीचा प्रयोगही केला. भाजीपाला, कांदा उत्पादनात त्यांचा हातखंडा होता. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करीत होते.
लवकरच पोचतो, काळजी नको !जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था करून दुपारनंतर ते कागलला गेले होते. उशीर झाल्यामुळे रात्री नऊच्या सुमारास वडीलांनी फोन केला असता निपाणीच्या पुढे आलोय लवकरच पोहचतो, काळजी करू नका, असे त्याने सांगितले. परंतु, साडेदहाच्या सुमारास गडहिंग्लज-आजरा महामार्गावरील बेळगुंदीनजीकच्या वळणावर दुचाकीवरून पडलेल्यामुळे ते बेशुद्ध झाले. छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
आता मुलींच्या शिक्षणाचीच चिंता!रूद्रगोंडा यांचे आईवडील वयोवृद्ध आहेत. तुटपुंज्या शेतीशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी भारती यांना आता मुलींच्या शिक्षणाचीच काळजी लागली आहे.