कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या गुरुवारी (दि. २३ जून) प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी दिले. त्यावर १ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार असून, दि. ९ जुलैैला अंतिम प्रभाग याद्या प्रसिद्ध केल्या जातील.राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ जून रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज, शुक्रवारी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या; परंतु आता सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या २३ जूनला प्रसिद्ध करण्यात येतील. विधानसभा मतदार याद्या संबंधित महानगरपालिकांना मिळण्यास विलंब झाल्याने प्रारूप मतदार याद्या तयार करण्यास विलंब होणार होता. त्यामुळे ही अडचण लक्षात घेऊन आयोगानेच गुरुवारी सुधारित कार्यक्रम जाहीर केला.कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केली होते. जवळपास ९० टक्के काम पूर्ण होत आले होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बसून हे काम पूर्ण करण्यात येणार होते. तोपर्यंतच हा सुधारित कार्यक्रम आल्याने अधिकाऱ्यांवरील दडपण थोडे कमी झाले.भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ ला अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदी संदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतात.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदारयाद्या २३ जून'ला प्रसिद्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 11:37 IST