प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज, शनिवारी दुपारी बारा वाजता ‘श्री नृसिंहसरस्वती स्वामी’ महाराजांचा जन्मकाळ सोहळा उत्साहात संपन्न झाला.गेले सात दिवस चालू असलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यात येथील दत्त देव संस्थानचे वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथील कृष्णा- पंचगंगा नदीच्या संगमावर श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या करून ‘मनोहर पादुकांची’ स्थापना केलेने त्यांच्या या तपसाधनेनेच या गावाला नृसिंहवाडी हे नाव मिळाले असलेने सदर जन्मोत्सवास येथे अनन्य साधारण महत्व आहे.पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजेनंतर श्री चरणावर रुद्राभिषेक करण्यात आला. उत्सव काळात सुरु असलेल्या श्रीमद गुरुचरित्र पारायणाची आज सांगता करण्यात आली. सकाळी अकरा वाजता वेदमूर्ती दिलीपशास्त्री उपाध्ये यांचे पुराण व दुपारी बारा वाजता ‘श्री गुरुदेव दत्त’ च्या गजरात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.जन्मकाळ प्रसंगी भाविकांनी आकर्षक फुलांनी सजविलेल्या श्रींच्या चांदीच्या पाळण्यावर अबिर गुलाल व फुलांची मुक्त हस्ताने उधळण केली.मानकरी नारायण पुजारी यानी श्रींची विधिवत पूजा केली. ब्रम्हवृंदांनी पाळणा म्हंटला आणि प्रार्थना केली. महिलांनी मोठ्या भक्तीने श्रींचा पाळणा जोजविला व मंगल आरतीने ओवाळले यानंतर भक्तांना सुंठवडा वाटप करण्यात आले.
श्री क्षेत्र नृसिंहवाडीत 'नृसिंहसरस्वती स्वामी' महाराजांचा जन्मकाळ सोहळा संपन्न, जन्मोत्सवास अनन्य साधारण महत्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 14:19 IST