कोल्हापूर : चैतन्य आणि मांगल्याची द्वाही फिरवणाऱ्या आणि विघहर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मकता पेरणाऱ्या गणरायांचा उत्सव आज, बुधवारपासून जल्लोषात सुरू झाला. भक्त गणरंगात न्हाऊन निघाले आहेत. ‘गणपत्ती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया'चा जयघोष, चिरमुरे, फुलांची उधळण करत कोल्हापूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेवून जाण्यासाठी शाहुपुरी, कुंभार गल्ली, बापट कॅम्प, पापाची तिकटी मोठी गर्दी केली. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले होते.महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात आदल्या दिवसापासूनच घरगुती गणेशमूर्तींसह सार्वजनिक मंडळांच्या गणेश आगमनाच्या मिरवणुकांनी शहर दणाणले होते. सकाळपासूनच लोकांच्या घरोघरी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायाच्या मूर्ती डोक्यावर घेऊन आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश मूर्ती घरी घेऊन जात आहेत. घरोघरी मोठ्या हौसेने सजवलेली आरास आणि सजावटीत ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाची मूर्ती घरोघरी विराजमान झाल्या आहेत. सार्वजनिक गणेशत्व मंडळांच्या मंडपांमध्येही गणपती बाप्पाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना सुरू आहे.
मूर्ती नेण्यासाठी कुंभारवाड्यांमध्ये गर्दीमोठ्या थाटामाटात लोक गणपती बाप्पाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करत आहेत.अनेक कुटुंबांमध्ये गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच गणेशमूर्ती घरी नेली जाते. कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, गंगावेश, पापाची तिकटी, बापट कॅम्प येथील कुंभार गल्ल्यांमध्ये गणेशमूर्ती नेण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती. डोक्याला ‘गणपती बाप्पा मोरया’ची रिबनपट्टी बांधून महिला, पुरुष तसेच बालचमू देवमूर्ती नेण्यासाठी आले होते.
आगमनाच्या मिरवणुकांनी रस्ते पॅकघरगुती गणेशाप्रमाणेच सार्वजनिक तरुण मंडळे साउंड सिस्टमसह वाजतगाजत गणेशमूर्ती नेल्या जात होत्या; त्यामुळे कोल्हापूर शहरच काय, तर उपनगरांतील रस्तेदेखील मिरवणुकांनी गच्च झाले होते. ठिकठिकाणी वाहतूक पोलिस व अन्य पोलिस वाहतुकीची कोंडी सोडवत होते.खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दीगणेश चतुर्थीमुळे सर्वत्र गणेश भक्तांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवामुळे बाजारपेठा कालपासूनच फुलल्या आहेत. अजूनही राहिलेली खरेदी पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरकरांनी महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, बाजारगेट, जोतिबा रोड, राजारामपुरी या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे खरेदीला मोठे उधाण आले आहे. दरम्यान, कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. परिसरात पोलीस तैनात आहेत.