पोपट पवारकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर शहरातील २० प्रभागांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक कार्यकर्त्यांनी मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध संस्था, संघटनांच्या भेटीगाठीतून जोर-बैठका काढण्यास सुरुवात केली असली तरी वरिष्ठांनी अद्यापपर्यंत निवडणुकीचे रणांगण एकसंघ की स्वबळावर ? याचे उत्तर दिले नसल्याने महायुती व महाविकास आघाडीचे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. युती किंवा आघाडीत वाट्याला किती जागा येणार, आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर होणार नाही ना, असे नानाविध प्रश्न नव्या प्रभागरचनेमुळे तयार झाल्याने सर्वच प्रमुख पक्षांनी युती-आघाडीचा फॉर्म्युला तात्पुरता गुंडाळून ठेवला आहे. मात्र, ऐनवेळी स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर पंचाईत नको म्हणून सगळ्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी स्वबळाची देखील तयारी सुरू केली आहे.कोल्हापूर महानगरपालिकेत २० प्रभागांतून ८१ नगरसेवकांसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. गेल्या सहा-सात वर्षांनंतर पहिल्यांदाच महापालिकेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार असल्याने इच्छुकांची संख्या कधी नव्हे ती मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील राजकारणाचा महायुतीचा फॉर्म्युला कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतही राबवणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते.मात्र, प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर वरिष्ठांकडून कोणत्याच सूचना मिळत नसल्याने महायुतीमधील भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वच प्रभागांमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
- ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरचे नेते घेतील. त्यांचा निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल. - सचिन चव्हाण, शहराध्यक्ष, काँग्रेस
- सध्या २० प्रभागांमध्ये राष्ट्रवादीकडे ६० उमेदवार तयार आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर ही संख्या वाढेल. मात्र, महायुती म्हणून निवडणूक लढवण्याबाबत निर्णय झाला, तर तो निर्णय अंतिम असेल. - आदिल फरास, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट
- महानगरपालिकेत सर्वच जागांवर लढण्यासाठी आमच्याकडे उमेदवार तयार आहेत; पण महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचे आदेश आले तर आम्ही त्या निर्णयाला बांधील राहून महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाऊ. - सुजीत चव्हाण, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना
- आम्ही सर्वच प्रभागांमध्ये तयारी सुरू केली आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवली तर आमच्या या तयारीचा लाभ आमच्या मित्र पक्षांनाही होणार आहे. - विजय जाधव, महानगरप्रमुख, भाजप
- आम्ही महाविकास नव्हे इंडिया आघाडी म्हणून महापालिका निवडणूक लढवणार आहे. मात्र, याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. - आर. के. पोवार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
- सध्या आमच्याकडे २५ उमेदवार तयार आहेत. निम्म्या प्रभागांमध्ये आम्ही तयारी केली आहे. आघाडीबाबत पक्षप्रमुख जे आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल. - रविकिरण इंगवले, जिल्हाप्रमुख उद्धवसेना