वाघापूर: महाराष्ट्र-कर्नाटकसह अन्य राज्यातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील संत सद्गुरु बाळूमामांचा ५९ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पार पडला. पुण्यतिथी उत्सवानिमित्त बाळूमामा देवालयाचा गाभारा विविध फुलांनी आकर्षकपणे सजवला होता. या सप्ताहात नामांकित व विद्वत्जन प्रवचनकार व कीर्तनकार यांची प्रवचने व कीर्तने झाली. कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, अध्यक्ष धैर्यशील भोसले, सरपंच विजय गुरव, सचिव रावसाहेब कोणकेरी, सर्व विश्वस्त, भाविक, ग्रामस्थांनी या महापारायण सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते. या सप्ताहात पहाटे श्रींचे समाधी पूजन, सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी राम कृष्ण हरि जप व बाळूमामा विजय ग्रंथाचे वाचन, सायंकाळी प्रवचन, रात्री हरिकिर्तन व पहाटेपर्यंत हरिजागर हे नित्याचे कार्यक्रम झाले. धैर्यशील भोसले यांच्या हस्ते वीणापूजन होऊन हरिनाम सप्ताहास प्रांरभ झाला. या महासप्ताहात ज्ञानेश्वरी पारायणास ५८० वाचक बसले होते.बाळूमामांच्या १८बग्ग्यातून बकऱ्यांची सेवा करणारे व त्यांची निगा ठेवणाऱ्या कारभार्यांचाही या सप्ताहात सत्कार करण्यात आला.या महासप्ताहात ह.भ.प.पूर्णानंद काजवे यांचे प्रवचन तर शाम नेरकर यांचे कीर्तन, उदय शास्त्री यांचे प्रवचन तर उमेश दशरथे यांचे कीर्तन, अशोक कौलवकर यांचे प्रवचन तर अनिल पाटील यांचे कीर्तन, नारायण एकल यांचे प्रवचन, संदिपान हासेगावकर यांचे कीर्तन, भानुदास कोल्हापुरे यांचे प्रवचन तर जयेश भाग्यवंत यांचे कीर्तन, बाबूराव पाटील यांचे प्रवचन तर श्रावण अहिरे यांचे कीर्तन झाले.इंद्रजित देशमुख यांचे प्रवचन तर जगन्नाथ पाटील यांचे कीर्तन व सामुदायिक हरिजागर झाला. बुधवारी सकाळी ह.भ.प.भाषाप्रभू जगन्नाथ पाटील यांचे काल्याचे कीर्तन होऊन सकाळी १० वाजता श्रींच्या पालखीचा दिंडी सोहळा मंदिराभोवती काढणेत आला. त्यानंतर महाप्रसाद होऊन हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
Kolhapur: आदमापूर येथे बाळूमामांच्या पुण्यतिथी उत्सवाला भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:07 IST