कोल्हापूर : आज सगळ्या सुखसोयी आहेत. मोठी घरे, स्वतंत्र बेडरूम्स आहेत; पण माणसेच हरवली आहेत. एकमेकांत संवाद नाही, दु:ख व्यक्त करता येत नाही, आनंद ओरडून सांगता येत नाही. शक्ती-संपत्तीमागे धावताना आयुष्यातले सत्त्व आणि सत्य समजायचेच राहून जाते. आपल्या आयुष्यात शांतीचा झरा अखंड वाहायचा असेल, तर आपल्या मंत्रांनी, ग्रंथांनी, संतवाणीतून उमटलेल्या सद्विचारांच्या शब्दरत्नांची कास धरा, असे प्रतिपादन गोविंद काळे यांनी केले. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी को-आॅपरेटिव्ह बँकेच्यावतीने आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेला आज, शुक्रवारपासून प्रारंभ झाला. प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सांगलीकर व करवीर मंगलधामचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी जयंत तेंडुलकर, हरिश्चंद्र अष्टेकर, श्रीकांत लिमये उपस्थित होते. उद्घाटनानंतर गोव्याचे गोविंद काळे यांनी ‘तुम्ही तरोनी विश्व तारा’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. ते म्हणाले, भारतीय संस्कृतीत ऋग्वेदापासून आजतागायत सद्विचारांची परंपरा चालत आली आहे. ‘सर्वे संतु निरामया’ या मंत्रातून सर्वांच्या हिताची कामना केली आहे. तुकाराम महाराजांनी ‘शब्दांचीच रत्ने’ असे म्हटले आहे; पण आपण भौतिक सुखाच्या मागे धावतो. आयुष्य संपत आले तरी आपण काय मिळवले, ते समजत नाही. एका क्षणी क्षणभंगूर जीवनाचे शाश्वत समजते. तोपर्यंत हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का, अशी अवस्था होते.त्यामुळे देवासमोर जेव्हा हात जोडाल, तेव्हा एकच मागणे मागा, मला सूर्यासारखे तेज दे, ओज दे, स्वत:सोबत दुसऱ्याचेही आयुष्य अधिक प्रकाशमान करण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’, या भावनेने नव्हे, तर तो तरुन गेला पाहिजे आणि आपल्यानंतर संकटात सापडेल्या व्यक्तींनाही त्याला तारून नेता आले पाहिजे. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत कासार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
सद्विचारांची साथ धरा-- तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला
By admin | Updated: November 28, 2014 23:57 IST