राजाराम लोंढेकोल्हापूर : उद्धवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या बंधूमध्ये मनोमिलनाची चर्चा सुरू झाल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. दोन भाऊ एकत्र यावे, ही महाराष्ट्राची पर्यायाने मराठी माणसाची इच्छा असल्याची भावना पदाधिकारी व्यक्त करत असून तसे झाले तर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळणार आहे.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे तयार झाले आहेत. अनेक वर्षे दोघांनी एकत्रित काम केले. मात्र, मार्च २००६ मध्ये शिवसेनेत दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे कारण सांगत राज ठाकरे यांनी जय महाराष्ट्र केला. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. गेली १९ वर्षे ते महाराष्ट्राच्या राजकारणात नवा पक्ष घेऊन सक्रीय झाले आहेत. एकसंध शिवसेना घेऊन उद्धव ठाकरे यांचाही प्रवास सुरू होता. मात्र, २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि पक्षच ताब्यात घेतला.शिवसेनेची ताकद विभागल्याने आगामी मुंबई महापालिकेसह सर्वच ठिकाणी उद्धवसेनेची परीक्षा राहणार आहे. त्यात हिंदीच्या मुद्यावरून दोन्ही भावांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे सुतोवाच केले. महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी एकत्र येण्याची दोघांनीही तयारी दाखवल्याने दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांमध्ये काहीसे चैतन्य दिसत आहे. दोन्ही भावांमध्ये विभागलेली ताकद एक झाले तर मुंबईसह महाराष्ट्रावर त्यांचे वर्चस्व राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.
भाजपला रोखण्याची ताकद ठाकरे बंधूमध्येचमहाराष्ट्रात भाजपचा वारू चौफेर उधळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची त्यांची तयारी पाहता, मुंबईसह प्रमुख महापालिका, जिल्हा परिषदा ताब्यात ठेवण्याची व्यूहरचना आहे. त्यामुळे भाजपला रोखायचे झाल्यास ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी अपेक्षा दोन्ही पक्षांतील सामान्य कार्यकर्त्यांची आहे.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघेही भाऊ ‘मातोश्री’मध्ये वाढले, मोठे झालेत. या दोघांनी एकत्र यावे, ही महाराष्ट्रातील मराठी माणसाची इच्छा आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी काही मंडळींनी गुजरात पुढे गुडघे टेकल्याने महाराष्ट्र अडचणीत आला. त्यातून बाहेर काढण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे. - संजय पवार (उपनेते, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना)
दोघांमध्ये रक्ताचे नाते आहे. काही राजकीय मतभेदामुळे ‘मनसे’ प्रमुख राज ठाकरे यांना निर्णय घ्यावा लागला. आता, एकत्र येण्याची चर्चा सुरू लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस सध्या अडचणीत आहे. त्याच्यासाठी दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र आलेतर मुंबईसह सर्व ठिकाणी त्याचे परिणाम दिसतील. - राजू दिंडोर्ले (जिल्हाप्रमुख, मनसे)